मुंबई : सर्जनशीलता, गुणवत्ता, बुद्धिमत्ता आणि सातत्याने नावीन्याचा ध्यास घेत भरीव कार्य करणाऱ्या तरुणांची जिद्द हा अनोखा मिलाफ अनुभवण्याची संधी दरवर्षी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांच्या निमित्ताने मिळते. विविध क्षेत्रांत अतुलनीय कार्य उभारणाऱ्या १८ लखलखत्या तरुण तेजांकितांचा सन्मान सोहळा आज, शुक्रवारी, २९ मार्च रोजी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत रंगणार आहे.

प्रसिद्धीपासून दूर राहून विविध क्षेत्रांत कार्यमग्न असलेल्या आणि आपल्या कार्यातून समाजासाठी आदर्श ठरणाऱ्या तरुणांना योग्य वयात पुरस्काररूपी कौतुकाची थाप देणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांचे हे सहावे वर्ष आहे. आत्तापर्यंत देशभरातील ८० हून अधिक तरुण तेजांकितांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात आला आहे. यंदाही विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा, साहित्य, कला, मनोरंजन, कायदा, धोरणे, राजकारण, प्रशासन, उद्योग-व्यवसाय अशा विविध क्षेत्रांतील १८ तरुण गुणवंतांचा सन्मान ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ सोहळय़ात करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>महायुतीत काही जागांचा तिढा कायम

देश-परदेशांतून आलेल्या शेकडो तरुण प्रज्ञावंतांच्या अर्जामधून या पुरस्कारांसाठी पात्र अशा १८ जणांची निवड करण्याचे काम मान्यवरांच्या परीक्षक समितीने केले. आयआयटी, मुंबईचे प्राध्यापक डॉ. मिलिंद अत्रे यांच्यासह ‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक डॉ. मुक्ता पुणतांबेकर, प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी या मान्यवरांच्या परीक्षक समितीने निवडलेल्या तेजांकितांना पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांतील अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. हा सोहळा निमंत्रितांसाठीच आहे.

स्वानंदी टिकेकर निवेदकाच्या भूमिकेत..

तरुणाईच्या जिद्दीला सलाम करणाऱ्या या पुरस्कार सोहळय़ाचे सूत्रसंचालन यंदा त्याच तरुणाईचे प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर करणार आहे. मालिका – चित्रपटांतून आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांना जिंकून घेणारी स्वानंदी तिच्या ओघवत्या शैलीत या सोहळय़ाचे सूत्रसंचालन करणार आहे.

‘ओ गानेवाली’.. उपशास्त्रीय संगीताची अनोखी मैफल

‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ सोहळय़ाला दरवर्षी रूढ प्रचलित कार्यक्रमांना छेद देणाऱ्या नावीन्यपूर्ण मनोरंजनात्मक कार्यक्रमांची साथ लाभते. समाजाकडून उपेक्षित राहिलेल्या उपशास्त्रीय संगीताची आणि एकेकाळी ते संगीत जगवणाऱ्या, त्याला कलारसिकांपुढे नेणाऱ्या गायिकांची गाणी, त्यांचे किस्से यांची सांगड घालत सादर होणारा ‘ओ गानेवाली’ हा संगीत कार्यक्रम या वेळी अनुभवता येणार आहे. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची तालीम घेतलेल्या अवंती पटेल आणि ऋतुजा लाड या गायिकांच्या गायन आणि निवेदनातून ही संगीत मैफल खुलत जाते. एकेकाळी ज्या गायिकांना गानेवाली म्हणत लोकांनी हिणवले, त्या बेगम अख्तर, गौहर जान, जद्दनबाई, विद्याधरीबाई यांनी निर्माण केलेले संगीत वैभव या कार्यक्रमातून रसिकांसमोर उलगडणार आहे. ठुमरी, दादरा, गझल, चैती, झूला असे कितीतरी गीतप्रकार आज या गायिकांमुळे अस्तित्वात आहेत. या गीत प्रकारांची झलक आणि प्रतिभावंत अशा या गायिकांच्या कथा यांचा मिलाफ असलेली, संकल्पनेपासून ते सादरीकरणातही वेगळेपणा असलेली ही संगीत मैफल आहे.

मुख्य प्रायोजक :महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

सहप्रायोजक :सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

ग्रॅव्हीटस फॉउंडेशन 

पीएनजी ज्वेलर्स

महानिर्मिती

केसरी टूर्स

सिडको

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

रिजन्सी ग्रुप

सहाय्य :वैभवलक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स

पॉवर्ड बाय :कमांडर वॉटरटेक प्रायव्हेट लिमिटेड

लक्ष्य अकॅडमी

नॉलेज पार्टनर : प्राइस वॉटरहाऊस कूपर्स