|| रसिका मुळ्ये
गुणपरीक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये अजूनही अविश्वास
परीक्षांचे निकाल वेळेत लावून परीक्षा विभागाचा कारभार सुधारल्याचा दावा मुंबई विद्यापीठाकडून करण्यात येत असला तरी निकालाच्या गुणात्मकतेबाबत विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकण्यात विद्यापीठाला यश आलेले नाही. कारण यंदाही परीक्षेनंतरच्या पुनर्मूल्यांकन अर्जाचा विद्यापीठाचा आलेख चढा आहे. उलट ऑक्टोबरच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षांच्या तुलनेत मे २०१९ मधील परीक्षांनंतर आलेल्या पुनर्मूल्यांकनाच्या अर्जामध्ये जवळपास २७ हजारांनी वाढ झाल्याचे दिसत आहे.
परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यापासून सुरू होणारा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या गैरव्यवस्थापनाचा प्रवास पुनर्मूल्यांकनाचे निकाल लागेपर्यंत सुरू असतो. परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर त्यात वारंवार बदल करणे, सदोष प्रश्नपत्रिका, निकालाच्या तारखांची लांबण, गुणपत्रिकांकरिता होणारा विलंब अशा प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना फक्त मनस्तापाला सामोरे जावे लागते. त्यात मूल्यांकनाच्या घोळाची भर पडते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा पुढे पुनर्मूल्यांकनाचा निकाल लागेपर्यंत सुरू राहते. यंदा अनेक निकाल वेळेवर जाहीर झाले, परीक्षा आणि निकालाची प्रक्रिया सुरळीत झाली, असे विद्यापीठ सातत्याने सांगते आहे. परंतु निकालच्या गुणात्मकतेबाबत विद्यार्थ्यांची शंका दूर झालेली नाही.
गेल्या शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या सत्रापेक्षा दुसऱ्या सत्रात पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या अर्जामध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या सत्रात (ऑक्टोबर २०१८) पुनर्मूल्यांकनासाठी ४२ हजार २०५ अर्ज आले होते. त्या अर्जाचा निपटारा पुढील परीक्षेच्या तोंडावर कसाबसा विद्यापीठाने केला. दुसऱ्या सत्रातील (मे २०१९) परीक्षांच्या निकालानंतर पुनर्मूल्यांकनाच्या अर्जात जवळपास २७ हजारांनी वाढ झाली असून ६९ हजार ८०२ अर्ज आले आहेत.
गेल्या सत्रात (मे २०१९) आलेल्या अर्जापैकी विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे अर्ज सर्वाधिक (३८ हजार ३२७) आहेत. त्या खालोखाल वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेतील २४ हजार ६५३, मानव्य विद्याशाखेतील ५ हजार २२० आणि आंतरविद्याशाखेतील १ हजार ६०२ अर्ज आले आहेत. छायाप्रतींसाठी ६ हजार ५९ अर्ज आले आहेत.
पुनर्मूल्यांकनाच्या निकालासाठी प्रतीक्षा
ऑक्टोबर २०१८ च्या परीक्षेनंतर आलेल्या ४२ हजार अर्जापैकी १३ हजार १६८ उत्तरपत्रिकांच्या निकालात बदल झाला. पुढील सत्राच्या परीक्षा तोंडावर आल्या. काही अभ्यासक्रमांच्या सुरूही झाल्या तरीही मे २०१९ च्या परीक्षांमधील पुनर्मूल्यांकनाचे सर्व निकाल अद्यापही जाहीर झाले नसल्याचे उत्तर विद्यापीठाने माहिती अधिकारात दिले आहे. पुनर्मूल्यांकनाचे शुल्क आणि निकाल वेळेवर न आल्यामुळे पुढील परीक्षा शुल्काचा भरुदडही विद्यार्थ्यांना भरावा लागला आहे. विहार दुर्वे यांनी ही माहिती विद्यापीठाने दिली आहे.
