कविता हा एक अखंड चालणारा सिलसिला आहे. जसा कबिराचा धागा. कविता काय करते? तर कालचा धागा आजशी जोडते आणि उद्याच वस्त्र विणते. अनेक शतके चालत असलेल्या या विणकामात उर्दूचेही चार टाके आहेतच. उर्दूच्या लावण्याला आणखी साज चढवते ती शायरी. उर्दूचा आणि शायरीचा हा विस्मयकारक प्रवास ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर उलगडतील ज्येष्ठ लेखक, पत्रकार अंबरीश मिश्र.
मध्ययुगीन भारतात एकीकडे अभूतपूर्व राजकीय संक्रमण, तर दुसरीकडे उर्दूची भरभराट असा प्रवास. अनेक भाषांच्या सावलीत उर्दू वाढली आणि सुस्वरूप झाली. तितकीच शक्तिशाली आणि समजूतदारही. अंगभूत नजाकत असलेल्या या भाषेची वळणे समजून घेताना तिच्या सौंदर्यात न्हाऊन निघता येईल. आपल्या ओघवत्या शैलीत अंबरीश मिश्र हे कविता आणि शायरी ही मैफल सादर करतील. लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले येथे ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत ही मैफल रंगेल. तसेच मिश्र यांचा साहिर लुधियानवी आणि सुरेश भट यांच्या रचनांवरील कार्यक्रम गडकरी रंगायतन येथे ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.१५ ते ६.४५ या वेळेत होणार आहे.
चित्रकला, कविता आणि लेखन कार्यशाळांतून दिग्गजांचे मार्गदर्शन
मुंबई : मराठी साहित्य, विविधांगी कला, संस्कृतीच्या सौंदर्यसोहळा ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या माध्यमातून अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. नवे नाट्यप्रयोग, साहित्य, संगीत यांचा आस्वाद घेण्याबरोबरच विविध क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन कार्यशाळांच्या माध्यमातून घेता येणार आहे. चित्रकला, कविता आणि लेखन कार्यशाळा ‘लिटफेस्ट’ मध्ये होणार आहेत. आघाडीचे लेखक, चित्रकार आणि कवी इच्छुकांना मार्गदर्शन करणार आहेत.
अभिजात साहित्य, कलासंस्कृतीचा नव्या जाणीव नेणिवेतून वेध घेत सादर होणारे विशेष प्रयोग हे ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे. याच सोहळ्यात चित्रकला, कविता आणि लेखन या कलांविषयी अधिक जाणून घेण्याची तसेच आपल्या कला जाणिवांना आकार देण्याची संधी मिळणार आहे. ‘उद्याचे लेखन घडवताना’ या सत्रात आघाडीचे कथालेखक, चित्रपटसमीक्षक आणि मालिका लेखन-दिग्दर्शन करणारे गणेश मतकरी तसेच कथालेखक ,चित्रपटसमीक्षक आणि पत्रकार निखिलेश चित्रे मार्गदर्शन करणार आहेत. हे सत्र पु.ल.देशपांडे सभागृह, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १२:१५ या वेळेत होईल.
लहान मुलांसाठी चित्रकलेच्या कार्यशाळाचे आयोजन २ नोव्हेंबर रोजी कलांगण, रवींद्र नाट्यमंदिर येथे सकाळी ११ ते दुपारी १२:३० या वेळेत करण्यात आले आहे. यावेळी ‘लोकसत्ता’तून आपल्या अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण चित्रांच्या माध्यमातून वाचकांना भेटणारे चित्रकार नीलेश जाधव हे लहान मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी इच्छुकांनी चित्रकलेचे साहित्य घेऊन यायचे आहे. कवितेच्या प्रांतात मुशाफिरी करणारे प्रसिद्ध कवी-गज़लकार वैभव जोशी हे कवितेच्या कार्यशाळेतून मार्गदर्शन करणार आहेत. कवितेची कार्यशाळा छोटे सभागृह, आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत होणार आहे. आपल्या आवडीच्या कलाप्रांतातील दिग्ग्जांचे मार्गदर्शनही इच्छुकांना ‘लिटफेस्ट’च्या निमित्ताने लाभणार आहे. या सर्व कार्यशाळा मोफत आहेत. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ७४००१९७५४९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर नोंदणी करावी आपले नाव आणि कोणत्या कार्यशाळेत सहभागी व्हायचे आहे हे नमूद करावे.
