रेणापूर कारखान्यातील प्रकार, वसुलीसाठी मारहाण
राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ मुंडे नगरीतील रेणापूर पानगाव सहकारी साखर कारखान्याचा कथित अधिकारी असलेला संजय गुडे याने पैसे वसुलीसाठी शिवाजी बसवराज चव्हाण या ऊसतोडणी कामगार मुकादमाचा मेव्हणा विनायक सोमला राठोड याचे चिखली (ता. किनवट) येथून गेल्या रविवारी अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे. पंकजा मुंडे यांच्या नावाने दहशत दाखवीत कारखान्याचे कथित ११ लाख रुपये वसूल करण्यासाठी गुडे याने हे प्रताप केले आहेत. गुडे याने जबरदस्तीने व आमिष दाखवून दीड एकर जमीनही लाटल्याची तक्रार शिवाजी चव्हाण यांची बहीण व चिखलीच्या उपसरपंच भागूबाई जाधव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी गुडे याचा आपल्याशी किंवा साखर कारखान्याशी कोणताही संबंध असल्याचा इन्कार केला आहे.
या अपहरण व मारहाणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्यापर्यंत तक्रार पोचविल्यावर विनायक याला अर्धमेल्या स्थितीत बुधवारी पहाटे परभणी परिसरात रस्त्यालगत सोडून देण्यात आले. तेथे एक ट्रक पकडून विनायक घरी परतला खरा, पण दहशतीमुळे तो आंध्र प्रदेशमधील आपल्या नातेवाईकांकडे लपून बसला आहे. शिवाजी हा साखर कारखान्यासाठी ऊसतोडणी मजूर पुरविणारा मुकादम आहे. त्याला कामगार पुरविण्यासाठी कारखान्याकडून काही लाख रुपये दिले जातात. ती रक्कम घेऊन ते पसार होऊ नयेत, यासाठी काही जमीन गहाण ठेवून घेतली जाते. त्यानुसार शिवाजीची दीड एकर जमीन गुडे याने गहाण ठेवली होती आणि २०१४ मध्ये शिवाजीच्या आईची दृष्टी अधू असल्याचा फायदा घेत त्यांना निबंधक कार्यालयात नेऊन ती जमीन आपल्या नावावर करवून घेतल्याचा आरोप भागूबाई जाधव यांनी केला आहे.
गुडे याला चव्हाण याच्याकडून कारखान्याचे ११ लाख रुपये येणे होते आणि व्याजाचे तीन लाख रुपये द्यावेत, असे त्याचे म्हणणे होते. तर दीड एकर जमीन परत द्यावी आणि आपलेच पैसे गुडे देणे लागतो, असा चव्हाण याचा दावा होता. पैशांच्या वादातून चव्हाण आंध्र प्रदेशात पळून गेला. त्यामुळे चिडलेल्या गुडे याने त्याचा मेव्हणा विनायक याला ही मारहाण केल्याचे भागूबाई यांनी सांगितले. भागूबाई यांनी गुडे याच्याशी अनेकदा दूरध्वनीवरून संभाषण केले. त्याचे ध्वनिमुद्रण ‘लोकसत्ता’कडे आहे. तातडीचे उपचार झाल्यावर भीतीमुळे विनायकला अन्यत्र पाठविले आहे. त्याला येथे आणून किनवट पोलिसांकडे तक्रार दाखल केली जाईल, असे भागूबाई यांनी स्पष्ट केले.
गोपीनाथ मुंडे हे ऊसतोड कामगारांचे नेते होते. त्यांच्या वारसांकडे असलेल्या कारखान्यात कामगारांवर अन्याय होत आहे, ही शोकांतिका आहे, अशी टीका किनवट येथील काँग्रेसचे नेते आकाश सुभाष जाधव यांनी केली आहे.
गुडेच्या धमक्या..
- मंत्रालय, गृहमंत्री कोणाकडेही जा, कोणी काहीच वाकडे करू शकणार नाही.
- गरीबाने गरीबासारखे राहावे, मोठय़ांचे पैसे घेऊ नयेत.
- शेतजमीन विकून माझे पैसे दिले नाहीत, तर विनायकला जिवंत सोडणार नाही.\
पंकजा मुंडे यांचा इन्कार
गुडेला मी ओळखतही नाही, तो कारखान्याचा पदाधिकारी, कर्मचारी नाही. ऊसतोड कामगार पुरविणाऱ्यांना कोटय़वधी रुपये दिले जातात आणि ती मंडळी मुकादमांकडून माणसे आणतात. माझे नाव वापरून कोणी गैरकृत्य केले असेल तर माहीत नाही, असा दावा पंकजा मुंडे यांनी केला होता. मात्र त्यांना दूरध्वनी संभाषणाचे ध्वनिमुद्रण पाठविल्यावर त्यांनी कारखान्याच्या संबंधितांकडे चौकशी केल्याचे सांगितले. त्यामुळे घाबरून विनायकची सुटका अपहरणकर्त्यांनी केली असावी, असा दावा करतानाच या प्रकरणात पोलीस कारवाई करतीलच, असेही त्या म्हणाल्या.