मुंबई मेट्रो भिवंडी, मीरा भाईंदपर्यंत जाणार; सार्वजनिक वाहतुकीचा जलद पर्याय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाढत्या प्रवाशीसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या पडत चाललेल्या उपनगरी रेल्वेगाडय़ांच्या गर्दीतून धक्के खात, धडपडत प्रवास करणाऱ्या ८० लाख प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा जलद पर्याय देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. येत्या पाच वर्षांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई-विरार आदी शहरांत मेट्रोचे जाळे विस्तारण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून लोखंडवाला-जोगेश्वरी-विक्रोळी- कांजूरमार्ग आणि ठाणे- भिवंडी- कल्याण या नव्या दोन मेट्रो मार्गाना बुधवारी एमएमआरडीएच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे मुंबईत ५०० ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट्स निर्माण करण्याचा निर्णयही  प्राधिकरणाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

घाटकोपर- वर्सोवा ही ११.४ किमी लांबीचा मुंबईतील पहिला मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एमएमआरडीएने आता खाजगीकरणाऐवजी स्वत:च मेट्रो प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईबरोबरचज ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, भिवंडी आणि मिरा भाईंदर या शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अडचण लक्षात घेऊन मेट्रोचा महानगर प्रदेशात विस्तार करण्याचे धोरण प्राधिकरणाने हाती घेतले आहे. गेल्या दोन वर्षांत मुंबईतील अनेक मेट्रो मार्गाना मंजूरी देण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई मेट्रोचा विस्तार आता कल्याण, भिवंडीपर्यंत होणार आहे. त्यानुसार कुलाबा- वांद्रे-सिप्झ या ३३.५ किमी लांबीच्या भूयारी मेट्रो, तसेच दहिसर-अंधेरी आदी मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू झाल्यानंतर एमएमआरडीएने आता आणखी काही प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत. त्यानुसार ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ आणि स्वामी समर्थ-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो- ६ या आणखी दोन प्रकल्पांची भर पडली आहे. या दोन्ही मार्गाच्या प्रकल्प अहवालास बुधवारी मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे दहिसरपासून मीरा भाईंदपर्यंत मेट्रो नेण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्याने येत्या पाच वर्षांत मेट्रोचे जाळे  निर्माण झाल्यानंतर उपनगरीय लोकलवरील ताण कमी होईल.

ठाण्याच्या पूर्वेकडील कोपरी येथील रेल्वेवरील पुलाच्या रुंदीकरणासाठी आणि तेथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी २९५  कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे हा पूल रुंद होणार असल्याने वाहतूक कोंडी सुटेल.

मेट्रोचे नवीन दोन मार्ग

  • ठाणे- भिवंडी- कल्याण हा २४ कि. मी. लांबीचा मार्ग आहे. या मार्गावर कल्याण एपीएमसी, कल्याण स्थानक, सहजानंद चौक, दुर्गाडी किल्ला, कोनगांव, गोवेगाव एमआयडीसी, राजनोली गाव, टेमघर, गोपाळनगर, भिवंडी, धामणकर नाका, अंजूर फाटा, पूर्णा, काल्हेर, कशेळी, बाळुकंभ नाका, कापुरबावडी अशी १७ स्थानके असतील. सुमारे ८ हजार ४१६ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
  • मुंबईतील स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी या मार्गाची लांबी १४.५ किलोमीटर असून प्रकल्पाची किंमत ६ हजार ६७२ कोटी रूपये आहे. या  मार्गावर स्वामी समर्थ नगर, आदर्श नगर, मोमीन नगर, जेव्हीएलआर, शामनगर, महाकाली गुंफा, सीप्झ गाव, साकी विहार मार्ग, रामबाग, पवई तलाव, आयआयटी पवई, कांजूरमार्ग (पश्चिम) विक्रोळी पूर्व द्रूतगती मार्ग अशी १३ स्थानके असतील.
  • महापालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही मार्गाचे भूमिपुजन करण्याचा विचार असल्याचे समजते.

मुंबई वायफाय

मुंबई शहरात वायफाय सुविधा निर्माण करण्याचाही निर्णय बुधवारच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्यात ५०० वायफाय हॉटस्पॉट निर्माण करण्यासाठी १९४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील अंमलबजावणी महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळातर्फे केली जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various metro project delcred by cm devendra fadnavis
First published on: 20-10-2016 at 01:46 IST