मुंबई : वडाळा विभागातील काँग्रेसच्या माजी नगरसेविका पल्लवी मुणगेकर आणि त्यांचे पती राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस महेंद्र मुणगेकर यांनी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. मुणगेकर या २०१२ या काळात वडाळा परिसरात नगरसेविका होत्या. मलबार हिल येथील मुक्तागिरी बंगला येथे सोमवारी हा पक्षप्रवेश पार पडला. आतापर्यंत विविध पक्षातील सुमारे १२५ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या तीन वर्षात मुंबईतील माजी नगरसेवकांनी एकेक करीत शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला आहे. सुरुवातीला केवळ शिवसेना (ठाकरे) सोडणाऱ्या माजी नगरसेवकांची संख्या मोठी होती. मात्र नंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी या पक्षांच्या माजी नगरसेवकांनीही शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला.

महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे शिवसेनेत (शिंदे) आधीपासूनच मुंबईतील २२७ प्रभागांसाठी उमेदवार उभे करण्यासाठी तयारी केली होती. त्यामुळे ठाकरे यांचे अनेक माजी नगरसेवक शिंदे यांच्या पक्षात येत होते. दर आठ – पंधरा दिवसांनी हे पक्षप्रवेश होत आहेत. त्यात काही माजी नगरसेवक हे २०१७ मधील, तर काही त्याआधीच्या काळातील आहेत.

मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असून निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडाही प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. एका बाजूला ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेत (शिंदे) जाणाऱ्या माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश आटल्याची चर्चा सुरू होती. मात्र गेल्या महिन्यात शिवसेनेतील (ठाकरे) शीव कोळीवाडा मतदारसंघातील माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला होता. त्यानंतर सोमवारी २५ ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या माजी नगरसेविकेने पतीसह शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांची संख्या सुमारे १२५ झाली आहे.

मलबार हिल येथील मुक्तागिरी बंगल्यावर भारतीय अन्न महामंडळाचे माजी सदस्य गणेश जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपाध्यक्ष आणि प्रवक्ते अविनाश राठोड, माजी आमदार रमेश मोरे यांचे पुतणे आणि भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी चिटणीस प्रशांत मोरे, स्वाभिमान संघटनेचे तालुका अध्यक्ष बालाजी कांबळे, नवनिर्माण असंघटित कामगार संघांचे निवृत्ती गायकवाड, हिंदी कवी योगेश चतुर्वेदी, हिंगोलीचे सरपंच डॉ. प्रल्हाद वाघमारे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष अमर तोडेकर, भारतीय लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कोतप्पा धोत्रे, प्रकाश डवले, युनायडेड रिपब्लिकन सफाई कर्मचारी संघाचे विकास पवार यांनीही शिवसेनेत (शिंदे) पक्षप्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी मंत्री दीपक केसरकर, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊ चौधरी, शिवसेना सचिव सुशांत शेलार, ज्येष्ठ शिवसैनिक पांडुरंग पाटील तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष पद न दिल्याने मुणगेकर नाराज ?

महेंद्र मुणगेकर हे काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या कुटुंबियांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांना दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्षपद अपेक्षित होते. ते पद त्यांना न देता कचरू यादव यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याने मुणगेकर हे नाराज होते असे समजते. त्यामुळे त्यांनी थेट काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

सध्या मुंबई काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई काँग्रेस पक्षातील आणखी काही नाराज माजी नगरसेवक, पदाधिकारी भाजप अथवा शिवसेनेत ( शिंदे) प्रवेश करणार असल्याचे समजते.