मुंबई : वसई – विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दाखल केलेला गुन्हा रद्द होणार की त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढणार ते आज स्पष्ट होणार आहे. पवार यांनी ईडीच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्यावर गुरूवारी दुपारी सुनावणी होणार आहे. वसई – विरार शहरातील बांधकाम घोटाळ्याप्रकरणी अनिलकुमार पवार सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ४१ अनधिकृत इमारतींच्या प्रकरणात मनी लाँड्रिंग अंतर्गत अटक केली आहे. त्यांच्यासोबत पालिकेचे तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी, माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि त्यांचा पुतण्या अरुण गुप्ता यांनाही अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी १३ ऑगस्टपासून तुरूंगात आहेत.

अनिलकुमार पवारांचे अटकेला आव्हान

अनिलकुमार पवार यांनी त्यांच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ही अटक बेकायदेशीर असून अधिकाराचा गैरवापर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या अटकेविरोधात ॲड. उज्ज्वल चव्हाण यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही अटक बेकायदेशीर, पक्षपाती आणि कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पवार यांना अडकवण्यासाठी निवडक गुन्हे रचून वेगवेगळे कथानक तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पवार यांच्या घरात केलेल्या झडतींमध्ये कोणतीही रोख रक्कम, दागिने किंवा मालमत्तेचे दस्तावेज सापडले नव्हते. काही नातेवाईकांकडून मिळालेली रोकड त्या नातेवाईकांचीच होती. पवार यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावे नसताना अटक करण्यात आली, असे याचिकेत म्हटले आहे. अवाजवी मालमत्ता तपासण्याचा अधिकार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला असतो, ईडीला नाही, याकडेही याचिकेत लक्ष वेधले आहे.

आज दुपारी सुनावणी, ईडी वेळ मागणार

या प्रकरणाची सुनावणी गुरूवारी दुपारी २ नंतर मुंबई उच्च न्यायालयातील दालन क्रमांक २६ मध्ये होणार आहे. पवार यांच्या वकिलांकडून अटकेला आव्हान देणारे दावे करण्यात आले आहेत. त्यावर उत्तर देण्यासाठी ईडी वेळ मागून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा आज निकाल लागणार नाही.

सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

या बांधकाम घोटाळ्यात माजी आयुक्त अनिलकुमार पवार, तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी, भूमाफिया सिताराम गुप्ता, अरूण गुप्ता यांच्या न्यायलयीन कोठडीची मुदत बुधवारी संपली. मात्र त्यांना जामीन मिळाला नाही. त्यांच्या न्यायलयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली. हे आरोपी १३ ऑगस्टपासून अटकेत आहेत. दरम्यान, ईडीने वाय. एस. रेड्डी यांची पुन्हा ६ दिवसांची कोठडी घेतली होती. तपास झाल्यानंतर त्यांची रवानगी पुन्हा न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.