Anil Pawar ED chargesheet: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वसई- विरार शहर महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना केलेली अटक उच्च न्यायालयाने बुधवारी बेकायदा ठरवली. पवार यांच्या अटकेचे समर्थन करण्यासाठी ईडीकडे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले. तसेच पवार यांची सुटका करण्याचे आदेश दिले. दरम्यान ईडीने १० ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक गंभीर आरोप केले आहेत. “महागडे दागिने, ७० हजार रुपयांचा पेन, आयफोन, अशा उंची भेटवस्तूच्या माध्यमातून लाच स्वीकारली गेली”, असा दावा ईडीने आरोपपत्रात केला आहे.
द इंडियन एक्सप्रेसने ईडीच्या आरोपपत्राचा हवाला देत सदर वृत्त दिले आहे. वसई-विरारमध्ये सरकारी जमिनीसह ४१ निवासी आणि व्यावसायिक इमारतीच्या बांधकाम प्रकरणी ईडीने १९ लोकांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यात वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार, त्यांच्या पत्नी भारती पवार, निलंबित माजी नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी, माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि अनेक वास्तुविशारद, बांधकाम व्यावसायिक, विकासक यांचा उल्लेख आरोपपत्रात केला आहे.
अवैध बांधकामांना मंजुरी देण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपांची चौकशी करत असताना ईडीने दावा केला आहे की, या गुन्ह्यात एकूण उत्पन्न ३००.९२ कोटी रुपये आहे आणि यापैकी १६९ कोटी रुपये अनिल पवार यांच्याशी संबंधित आहेत.
तपासात काय निष्पन्न झाले?
ईडीच्या आरोपपत्रानुसार, तपासात असे दिसून आले की, अनिल पवार आणि वायएस रेड्डी यांनी बेकायदेशीररित्या गोळा केलेल्या पैशातून मिळालेली रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी आणि महागड्या भेटवस्तू खरेदीसाठी वापरली गेली. पवार आणि रेड्डी यांच्या व्हॉट्सॲप चॅटवरून असे दिसून येते की, रेड्डी यांनी पवार यांच्या कुटुंबियांसाठी महागड्या साड्या, हिरेजडीत मौल्यवान दागिने खरेदी केले. यावरून असे दिसून येते की, लाचेची रक्कम महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी वळविण्यात आली.
कथित व्हॉट्सॲप चॅट्सच्या स्क्रिनशॉटमध्ये खरेदी केलेल्या दागिन्यांचे फोटो, रेड्डी यांनी खरेदीसाठी मंजूर केलेला ७० हजार रुपयांचा पेन आणि इतर खर्चाचा समावेश आहे. या आरोपपत्रात मध्यस्थ आणि इतरांचेही जबाब आहेत. ज्यात असा दावा केला आहे की, रेड्डी यांनी गुन्ह्यातून मिळालेले पैसे हॉटेल, क्रिकेट सामने, कॉन्सर्ट तिकिटे, परदेशी चलन आणि आयफोन खरेदीसाठी खर्च केले.
एका विकासकाशी झालेल्या चॅटमध्ये वायएस रेड्डी यांनी नमूद केले आहे की, त्यांचा मासिक खर्च पाच लाख रुपये आहे. दिवाळीसारख्या सणांवेळी हा खर्च एक कोटी रुपयांपर्यंत वाढतो, असाही आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे.
अनिल पवार यांच्याबाबत उल्लेख काय आहेत?
माजी आयुक्त अनिल पवार आणि त्यांच्या पत्नीच्या नातेवाईकांमार्फत पैसे वळविले गेल्याचाही आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. त्यानंतर या पैशांनी विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी करण्यात आल्या. रिअल इस्टेट फर्म्स, गोदामाच्या साखळ्या किंवा कन्सलटन्सी सर्विसेसच्या माध्यमातून हे पैसे वळते केले गेले, जेणेकरून त्याचा स्त्रोत निष्कलंक दाखवता येईल. उदाहरणार्थ, पवार यांच्या पत्नी भारती यांना चार कंपन्यांकडून मासिक वेतन मिळत असल्याचे दाखला दिला आहे.