मुंबई : उन्हाळय़ाची सुट्टी, लग्नसराई यानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मुंबई, नवी मुंबई येथून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) ८ मेपासून नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरांतील प्रवाशांच्या सुविधेसाठी वाशी-स्वारगेट (पुणे) शिवनेरी सेवा सुरू केली. मात्र, प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे अवघ्या दोनच दिवसांमध्ये एसटी महामंडळाने ही सेवा बंद केली.
लग्नसराई आणि उन्हाळी सुट्टीनिमित्त प्रवाशांची संख्या वाढल्याने एसटी महामंडळाने वाशी-स्वारगेट मार्गावर दररोज डिझेलवर धावणारी वातानुकूलित शिवनेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही शिवनेरी बस विनावाहक होती. शिवनेरीची पहिली सेवा वाशीहून सकाळी ६.१५ वाजता, त्यानंतर सकाळी ७.१५, दुपारी २.१५ आणि शेवटची फेरी दुपारी ३.१५ अशी होती. तर, स्वारगेटवरून वाशीला जाणारी शिवनेरी सकाळी १०.१५, सकाळी ११.४५, सायंकाळी ६.४५ आणि शेवटची फेरी सायंकाळी ७.४५ वाजता होती. मात्र, प्रवाशांना आवश्यक असलेल्या वेळी शिवनेरीची फेरी नसल्याने या सेवेला प्रतिसाद मिळाला नाही.
प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने आठ वर्षे आयुर्मान असलेली वाहने मुंबईत चालवू शकत नाही. त्यामुळे एसटीच्या शिवनेरी बस वाशी येथून चालवण्यास सुरुवात केली. मात्र, एसटीच्या अनियोजित वेळेच्या फेऱ्या, नवी शिवनेरी सेवेबाबत जाहिरातीचा अभाव यामुळे प्रवाशांना माहिती मिळाली नाही. तसेच वाशीहून स्वारगेटला जाणारी बस प्रवाशांनी भरून जायची. मात्र, स्वारगेटहून येताना बसमध्ये कमी प्रवासी असायचे. प्रवासी दादर किंवा ठाण्याला जाणाऱ्या शिवनेरी बसला प्राधान्य देत होते. त्यामुळे दोनच दिवसांत वाशी-स्वारगेट शिवनेरी बस फेरी रद्द करण्यात आली असावी, असे मत एका प्रवाशाने व्यक्त केले.
वाशी ते स्वारगेट (पुणे) ही सेवा बंद करण्यात आली असून या शिवनेरी पुणे आगाराकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. पुणे आगाराच्या माध्यमातून प्रवाशांसाठी या बसचे नियोजन करण्यात येईल. शिवनेरी बसला आठ वर्षे झाल्याने या बस फेऱ्या बंद करण्यात आल्या.