काँग्रेसच्या नेतृत्वात देशभरातील विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली. मात्र, अद्यापही काही पक्ष या आघाडीतून बाहेर आहेत. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने अनेकदा इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केलेली असतानाही अद्याप ‘इंडिया’कडून तसं निमंत्रण आलेलं नाही. याला वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेस-राष्ट्रवादीला जबाबदार धरलं जात आहे. आता वंचितने काँग्रेसवर सीपीआयचा (एम) प्रवक्ता म्हणून वापर करत असल्याचाही आरोप केला.

वंचित बहुजन आघाडीने म्हटलं, “काँग्रेस सीपीआयचा (एम) प्रवक्ता म्हणून वापर करत आहे. सीताराम येचुरी यांनी राष्ट्रपतीपदासाठी यूपीएचे उमेदवार म्हणून प्रकाश आंबेडकरांचे नाव सुचवल्यावर काय झाले होते? काँग्रेसचा प्रतिसाद काय होता ते आता सीताराम येचुरींनी देशाला सांगावे.”

“वंचित समूहाच्या व्यक्तीला देशाचे सर्वोच्च पद देण्याचे श्रेय यूपीएला मिळू शकले असते”

“बाळासाहेबांची आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट होती. दलित विरुद्ध दलित का? व कशासाठी? त्याऐवजी, काँग्रेस आणि डावे पक्ष यांनी आदिवासी उमेदवार राष्ट्रपतीपदासाठी द्यावा, हा ॲड प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव होता. एका वंचित समूहाच्या व्यक्तीला देशाचे सर्वोच्च पद देण्याचे श्रेय यूपीएला मिळू शकले असते,” असं वंचितने म्हटलं.

“आम्ही तेच ते प्रश्न ऐकून आणि त्याची उत्तरे देऊन कंटाळलो आहोत”

वंचितने सीताराम येचुरी यांना उद्देशून म्हटलं, “प्रिय सीताराम येचुरी आम्ही तेच ते प्रश्न ऐकून आणि त्याची उत्तरे देऊन कंटाळलो आहोत. हे प्रश्न प्रकाश आंबेडकरांना पुन्हा पुन्हा विचारण्यापेक्षा आता आपण इंडिया आघाडीला हे विचारणे गरजेचे आहे की, कधीपर्यंत दलितांचे मसिहा बनण्याचे ढोंग रचणार आहात?”

हेही वाचा : “ठाकरेंबरोबर साखरपुडा झालाय, पण लग्नासाठी दोन भटजी…”; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दलितांचे राजकारण आपल्या वर्चस्वाखाली ठेवणार? दलितांना सत्तेत बरोबरीने वाटा देण्याची त्यांची खरोखर तयारी आहे का?” असा सवालही वंचितने विचारला.