मुंबई : हिंदी-मराठी चित्रपटात साकारलेल्या चरित्र भूमिकांमधून लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे सोमवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. येत्या २२ ऑगस्टला त्यांचा ९१ वा वाढदिवस साजरा होणार होता, मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती पोतदार यांच्या कन्या अनुराधा पारसकर यांनी दिली.
सोमवारी रात्री अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांना तातडीने ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांंच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अर्थशास्त्राचे प्राध्यापक, सैन्यदलातील चमकदार कामगिरी, तेथून निवृत्त झाल्यानंतर २५ वर्षे इंडियन ऑईल कंपनीतील काम सांभाळून अभिनयाचे वेड जपणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचा जीवनप्रवास हा बहुआयामी होता. त्यांची अभिनय क्षेत्रातील वाटचाल उशिरा सुरू झाली असली तरी त्यांनी पंडित सत्यदेव दुबे, विजया मेहता, सुलभा देशपांडे यांच्यासारख्या नाट्यक्षेत्रातील दिग्गजांबरोबर दीर्घकाळ काम केले होते.
रंगभूमी ते पुढे हिंदी-मराठी चित्रपट अशी मजल दरमजल करत छोटा पडदाही त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवला. मराठी आणि हिंदी मिळून तब्बल १२५ चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. जाहिरातविश्वातही ते तितकेच लोकप्रिय होते. ‘तेजाब’, ‘परिंदा’, ‘अंगार’, ‘रंगीला’, ‘राजू बन गया जंटलमन’ अशा कित्येक हिंदी चित्रपटांतून त्यांनी केलेल्या चरित्र भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. अगदी राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील त्यांचा ‘कहना क्या चाहते हो…’ हा संवाद खूप गाजला होता.
मालिकांमध्येही ठसा
मालिका विश्वातही ‘भारत एक खोज’, ‘वागळे की दुनिया’ अशा लोकप्रिय मालिकांचा ते भाग होते. २०२२ मध्ये ‘झी मराठी’ वाहिनीवर त्यांनी ‘माझा होशील ना’ या मालिकेत साकारलेली आप्पांची भूमिकाही प्रचंड लोकप्रिय ठरली. करोना काळातही त्यांनी चित्रीकरणात सहभाग घेत मालिकेत काम केले होते. गेल्या वर्षी २२ ऑगस्टला त्यांचा ९० वा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला होता. चित्रपट-नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर त्यावेळी उपस्थित होते. त्यांचा जीवनप्रवास उलगडणारे ‘अच्युत पोतदार – अ लाईफ ऑफ सिम्पलिसिटी, रेझिलिएन्स अँड कन्टेन्टमेन्ट’ या त्यांच्या कन्या अनुराधा पारसकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचेही प्रकाशन त्या सोहळ्यात करण्यात आले होते.