ज्येष्ठ अभिनेते अनू कपूर यांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आरोपीला बिहार येथून अटक करण्यात ओशिवरा पोलिसांना यश आले आहे. आशिष जगदीश पासवान (२८) असे अटक आरोपीचे नाव असून तो बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी आहे. आशिषने अनू कपूर यांच्या बँक खात्यातून चार लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केली असून त्यापैकी तीन लाख आठ हजार रुपये वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे.

हेही वाचा >>>तुमच्या घराची अज्ञातांकडून रेकी? संजय राऊत म्हणाले “मी जेलमधून बाहेर आलो तेव्हा, ‘सामना’ कार्यालयात बसलेलो असताना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनू कपूर यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘तेजाब’ चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली होती. अनू कपूर हे अंधेरीतील ओशिवरा परिसरातील लिंक रोडवरील मिरा टॉवरसमोरील विंडर मेअर अपार्टमेंटमध्ये राहतात. सप्टेंबर महिन्यात ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना कृष्णकुमार रेड्डी नावाच्या एका व्यक्तीचा दूरध्वनी आला होता. त्यांच्या बँकेच्या मुख्य कार्यालयातून बोलत असल्याचे त्याने सांगितले. तुम्ही बँक खात्याचे केवायसी अद्ययावत केलेले नाही. केवायसी अपडेट केले नाही तर बँक खाते बंद होईल, असे सांगून त्याने त्यांच्याकडून बँक खात्याची माहिती आणि मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक घेतला. त्याच्यावर विश्वास ठेवून अनू कपूर त्यांनी ही माहिती त्याला दिली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये आणि दोन लाख ३६ हजार रुपयांचे दोन ऑनलाईन व्यवहार झाले. बँक खात्यातून चार लाख ३६ हजार रुपये हस्तांतरित झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ओशिवरा पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या प्रकरणाचा तपास करीत असतानाच अनू कपूर यांची फसवणूक करणारी व्यक्ती बिहारच्या दरभंगा शहरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने दरभंगा येथून आशिष पासवान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानेच हा गुन्हा केल्याचे चौकशीत उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाइल, एक आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र आणि दोन सिमकार्ड जप्त केले.