viju khote death: मराठीसह हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा अवीट ठसा उमटविणारे आणि शोले चित्रपटातील कालिया पात्र अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. गावदेवी येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. विजू खोटे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अभिनेते विजय खोटे यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने हिंदी-मराठी सिनेमा सृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती. मराठी रंगभूमीबरोबर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात दमदार भूमिका केल्या. भारतीय सिने इतिहासात विशेष नोंद केल्या गेलेल्या शोले सिनेमातील कालियाची भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली गेली. शोलेतील गब्बर जेव्हा अबे ओ कालिया, तेरा क्या होगा?, असे विचारतो तेव्हा कालिया घाबरत उत्तर देतो, ‘कु..कु..छ नही सरकार, मैने तो आपका नमक खाया हैं’ हा संवाद अंत्यंत गाजला. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाची चर्चा होते, तेव्हा कालियाचं पात्र हमखास चर्चेत येतं.
विजू खोटे काळाच्या पडद्याआड: या आहेत त्यांच्या गाजलेल्या भूमिका आणि सिनेमेhttps://t.co/0XrSm1xcWC
‘शोले’, ‘अशी ही बनवाबनवी’ आणि ‘अंदाज अपना अपना’ सिनेमांतील भूमिका चांगल्याच गाजल्या#VijuKhote #Marathi— LoksattaLive (@LoksattaLive) September 30, 2019
खोटे यांनी तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. मराठीतील ‘या मालक’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आयत्या बिळावर नागोबा’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांनी असंख्य छोट्या भूमिका केल्या. अभिनय कौशल्य आणि अप्रतिम संवादफेक लाभलेल्या खोटे यांनी साकारलेल्या भूमिका दर्शकांच्या मनात कायम राहिल्या. विजू खोटे यांनी आपल्या कारकीर्दीला नायकाच्या भूमिकेपासून प्रारंभ केला. पुढे त्यांनी छोट्या परंतु स्मरणात राहतील अशा भूमिका साकारल्या.