आपल्या ३३ वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत विधायक, सामाजिक आणि राजकीय वृत्तांकनांच्या माध्यमातून विविधांगी लेखन करणारे ज्येष्ठ पत्रकार अशोक आचार्य यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.
औरंगाबाद येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांनी माध्यमक्षेत्रात प्रवेश केला. नंतर सरकारी नोकरी सोडून आचार्य यांनी ‘सकाळ’ या दैनिकातून पत्रकारितेला प्रारंभ केला. ‘महाराष्ट्र टाइम्स’ हे वृत्तपत्र सुरू झाल्यानंतर ते टाइम्स समुहात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय विषयांवर विपुल लेखन केले. १९९३ मध्ये ते विशेष प्रतिनिधी या पदावरून सेवानिवृत्त झाले. ‘लोकसत्ता’चे सहसंपादक संदीप आचार्य यांचे ते वडील होत. रविवारी सायंकाळी कांदिवली डहाणुकर वाडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.