मुंबई : ‘ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर नजर टाकल्यानंतर असंख्य पैलू आपल्याला दिसतील. ‘परिपूर्ण तात्विक असे जीवन गायिका माणिक वर्मा जगल्या. ‘माणिक मोती’ या पुस्तकातून त्यांच्या जीवनाचे सार फार सुरेखरित्या उलगडण्यात आले आहे’ , असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.

यंदाचे वर्ष माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे ‘माणिक स्वर शताब्दी २०२४-२०२५’ म्हणून साजरे केले जाणार असून वर्षभर सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याअंतर्गत महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि माणिक वर्मा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शोभा बोंद्रे लिखित आणि राजहंस प्रकाशित ‘माणिक मोती’ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात गायिका माणिक वर्मा यांचे जीवन, संघर्ष, सांगीतिक कारकीर्द आणि त्यांचा समृद्ध वारसा मांडण्यात आला आहे. या सोहळ्याला ॲड.आशिष शेलार आणि प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर लेखक अच्युत गोडबोले यांच्यासह अनेक नामवंत साहित्यिक, कलाकार आणि संगीप्रेमींनी हजेरी लावली होती. याप्रसंगी ‘हसले मनी चांदणे’ या संगीतमय कार्यक्रमात संगीतकार कौशल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या समूहाने माणिक वर्मा यांची अजरामर गीते सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिरा गुजर यांनी केले. तर गायिका राणी वर्मा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत पुस्तकासाठी सहकार्य केलेल्या सर्व मंडळींचे आभार मानले.

दरम्यान, १६ मे रोजी माणिक वर्मा यांचा जन्मदिवस असून याप्रसंगी प्रसिद्ध शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांना ‘माणिक रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. याच दिवशी ‘चौरंग’चे अशोक हांडे आणि माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे माणिक वर्मा यांच्या जीवनावरील ‘माणिक मोती’ हा कार्यक्रम माटुंगा रोड (पश्चिम) येथील यशवंत नाट्यगृह येथे सायंकाळी ७.३० वाजता सादर करण्यात येणार आहे. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने यंदा माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे वेगवेगळ्या सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.