ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दुखंडे यांचे आज (मंगळवारी) सावंतवाडी येथे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी उर्मिला, मुलगी सोनाली आणि संतोष आणि संदीप अशी दोन मुले आहेत. त्यांचे पार्थिव आज रात्री मुंबईत आणण्यात येणार आहे. उद्या सकाळी गोरेगाव येथील सिद्धार्थ नगरमधील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. प्रा. दुखंडे यांची दोन्ही मुले परदेशात असतात. ते आल्यानंतर उद्या सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रा. दुखंडे हे समाजवादी वर्तुळात ‘सर’ म्हणून परिचित होते. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. लहानपणापासून संघर्ष करीत दुखंडे यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. गोरेगावहुन ते सकाळी भिवंडी येथे महाविद्यालयात जात असत. शिक्षण सुरु असतानाच ते नोकरीही करत होते. नोकरीवरून सुटल्यानंतर ते जनता दल, छात्रभारती आणि इतर सामाजिक कार्यासाठी वेळ देत असत. ‘युक्रांद’ या युवक चळवळीमधून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली होती.

कोकणच्या प्रश्नांबाबत त्यांना प्रचंड आस्था होती. परळच्या दामोदर हॉलच्या पटांगणात त्यांनी कोकणी बाजार पेठ भरवली होती. कोकण रेल्वे सुरु व्हावी, यासाठी झालेल्या प्रत्येक आंदोलनात दुखंडे यांचा सहभाग असे. कोकणातील मुलांना कोकण रेल्वेमध्ये नोकरी मिळावी, म्हणून अभिजीत हेगशेटये, युयुत्स्य आर्ते या छात्र भारतीच्या मुलांना घेऊन त्यांनी “कोकण रेल्वे जनाधिकार समिती”ची स्थापना केली होती. प्रा. मधू दंडवते यांचे ते निकटचे सहकारी होते. मालवण विधानसभा मतदार संघातून त्यांनी १९९५ साली नारायण राणे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मुंबई विद्यापीठात ते सिनेटचे सदस्य होते. मुंबई विद्यापीठाचा कारभार मराठीत चालावा असा आग्रह ते प्रत्येक सभेत घेत होते. कोकणात विद्यापीठाचे उपकेंद्र झाले पाहिजे, याचा त्यांनी छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आग्रह धरला आणि रत्नागिरी येथे ते उपकेंद्र मंजूर करून घेतले. छात्रभारतीच्या मुंबईच्या कामात त्यांनी पहिल्यापासून लक्ष घातले होते. कपिल पाटील, शरद कदम या त्यावेळच्या विद्यार्थी नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी अनेक आंदोलने केली. रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन छात्र भारतीने काढलेला रात्रीचा पहिला बॅटरी मोर्चा, त्यावेळचे महापालिका उपायुक्त गो. रा. खैरनार यांना घेऊन रुईया कॉलेजच्या नाक्यावर कुलगुरू डॉ. कर्णिक यांच्या विरोधात केलेले आंदोलन, गिरणी कामगारांच्या लढाईत दत्ता इस्वलकर यांच्या नेतृत्वाखाली काढलेला मोर्चा, भारतमाता सिनेमा वाचविण्यासाठी झालेले आंदोलन, नामांतर लढा, मंडल आयोग स्थापन करण्यासाठी उभारलेल्या प्रत्येक लढ्यात प्रा. दुखंडे अग्रभागी होते. जनता दलाचे ते काही काळ प्रदेश सचिव होते. काही वर्षांपूर्वी ते सावंतवाडीत स्थायिक झाले होते. या वयात ही ते सिंधुदुर्गात होणाऱ्या सर्व सामाजिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहत होते. प्रा. गोपाळ दुखंडे सरांनी आमच्यासाठी आणि या चळवळीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या जाण्याने व्यक्तिशः माझी आणि पुरोगामी चळवळीची हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्र सेवा दलाचे मुंबई कार्याध्यक्ष शरद कदम यांनी व्यक्त केली.