|| प्रसाद रावकर
(कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, वरळी, शिवडी, भायखळा)
दक्षिण मुंबईतील अन्य चार मतदारसंघांत शिवसेना-भाजपचे वर्चस्व कायम:-एकीकडे सर्व प्रमुख सरकारी कार्यालये, कचेऱ्या, बँकांची मुख्यालये, उच्चपदस्थांची निवासस्थाने, दुसरीकडे अत्यंत दाटीवाटीने उभ्या असलेल्या चाळी, तिसरीकडे गिरण्यांच्या चिमण्यांना ठेंगा दाखवत आकाशाकडे झेपावत चाललेल्या गगनचुंबी अशी वैविध्यपूर्ण रचना असलेल्या आणि उच्चभ्रूंपासून गरिबांपर्यंतच्या प्रत्येक वर्गाचे प्रतिनिधित्व असलेल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ मोडतात. यापैकी कुलाबा, मलबार हिल, वरळी आणि शिवडी या मतदारसंघांवर भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. मात्र गत विधानसभा निवडणुकीत ‘मोदी लाट’ असतानाही मुंबादेवी आणि भायखळा या मतदारसंघांत शिवसेना आणि भाजपला पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे या मतदारसंघांवर युतीचे विशेष लक्ष असणार आहे.
भायखळा
पुनर्रचनेत नागपाडा, चिंचपोकळी आणि लगतच्या मतदारसंघांचा काही भाग एकत्र होऊन बनलेल्या भायखळा विधानसभा मतदारसंघात २००९ मध्ये काँग्रेसने बाजी मारली होती. या मतदारसंघातील मुस्लीमबहुल भागावर काँग्रेसची मदार होती. काँग्रेसचे मधु चव्हाण त्या वेळी ३६ हजार ३०२ मते मिळवून विजयी झाले होते, तर मनसेचे संजय नाईक यांना २७ हजार १९८ मते मिळाली. कुख्यात गुंड अरुण गवळीची दगडी चाळ याच मतदारसंघात आहे. अरुण गवळी अ. भा. सेनेच्या उमेदवारीवर २००९च्या विधानसभा निवडणूक रिंगणात उतरला होता. मात्र मतदारांनी मधुकर चव्हाण यांच्या बाजूने कौल दिल्याने भायखळ्यात काँग्रेसचा तिरंगा फडकला. मात्र २०१४च्या निवडणुकीत काँग्रेसला हा गड राखता आला नाही. मोदी लाटेमुळे या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत होईल असे चित्र दिसत होते. मात्र प्रत्यक्षात घडले वेगळेच. एआयएमआयएमचे उमेदवार वारिस पठाण यांच्या गळ्यात विजयश्री पडली आणि सर्वच राजकीय पक्ष अवाक् झाले. मुस्लीमबहुल मतदारसंघातील मतदारांनी काँग्रेसची साथ सोडत एआयएमआयएमला साथ दिल्यामुळे भायखळ्यातील राजकीय समीकरणे बदलल्याचे स्पष्ट झाले.
समस्या
- बकाल झोपडय़ांची स्वच्छता
- वाहतूक कोंडीमुळे रखडणारी वाहतूक
- झोपडपट्टीवासीयांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण
- चाळींचा रखडलेला पुनर्विकास
मुंबादेवी
काही वर्षांपूर्वी भाजपचा बालेकिल्ला म्हणून मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ ओळखला जात होता. हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित अमराठी मतदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपने या परिसरात अधिराज्य गाजविले. १९९०, १९९५, १९९९ आणि २००४च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे राज के. पुरोहित यांनी अमराठी मतांच्या पाठिंब्यावर हा मतदारसंघ राखला. विधानसभेच्या २००९च्या निवडणुकीपूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि त्यात मुंबादेवीचा विस्तार झाला. डोंगरी, सॅण्डहर्स्ट रोड आदी मुस्लीमबहुल भाग या मतदारसंघांत समाविष्ट झाला. त्यामुळे या मतदारसंघातील समीकरणेच बदलून गेली. २००९मध्ये हा मतदारसंघ भाजपने शिवसेनेच्या झोळीत टाकला. शिवसेनेने माजी आमदार चंद्रकांत पडवळ यांचे पुत्र अनिल पडवळ यांना रिंगणात उतरविले. मुस्लीमबहुल भागातील मतांच्या जोरावर काँग्रेसचे अमिन पटेल विजयी झाले. विधानसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती संपुष्टात आली. मराठी आणि अमराठी मतांचे झालेले विभाजन काँग्रेसच्या पथ्यावर पडलेच. मुस्लीम मतांच्या जोरावर अमिन पटेल पुन्हा एकदा विजयी झाले. एकेकाळी भाजपचा गड असलेल्या या मतदारसंघात भाजपच्या अतुल शाह यांना पराभव पत्करावा लागला होता.
समस्या
- दाटीवाटीने उभ्या जीर्ण चाळींचा पुनर्विकास
- चाळींदरम्यानच्या घरगल्ल्यांमधील कचऱ्याचा प्रश्न
- अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा
- सोनारांच्या पेढय़ांचा प्रश्न ऐरणीवर
- अरुंद गल्ल्या, लहान रस्त्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा
वरळी
एकेकाळी भल्या पहाटे गिरण्यांच्या भोंग्याने जागा होणारा वरळी मतदारसंघ. कष्टकरी गिरणी कामगारांचा आश्रयस्थान बनलेला हा परिसर. कालौघात गिरण्या बंद पडल्या, पुनर्विकासाने कास धरली आणि जुन्या चाळीची जागा टोलेजंग इमारतींनी घेतली. मात्र वरळी कोळीवाडय़ाच्या विकासाचे घोंगडे भिजतच पडले आहे. टोलेजंग इमारतींमुळे आकर्षित करणाऱ्या या परिसरात सातरस्ता धोबीघाट, जिजामाता नगर, सुभेदार रामजी आंबेडकर नगर, प्रेम नगर, सिद्धार्थ नगर या झोपडपट्टय़ाही विसावल्या आहेत. एकेकाळी हा अस्सल मराठमोळा परिसर होता. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मराठी टक्का घसरला आणि गुजराती, जैन मंडळींची या परिसरातील संख्या वाढत गेली. १९९०, १९९५, १९९९ आणि २००४च्या निवडणुकीत वरळीकरांनी शिवसेनेचे दत्ताजी नलावडे यांना विजयी करून विधानसभेत पाठविले.
शिवसेनेचा वारू २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने रोखला. या मतदारसंघाच्या आखाडय़ात उतरलेले शिवसेनेचे उमेदवार आशीष चेंबूरकर यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर विजयी झाले. त्यानंतर २०१४च्या निवडणुकीत सचिन अहिर यांना पराभवाची धूळ चारत शिवसेनेचे सुनील शिंदे विजयी झाले आणि शिवसेनेने पुन्हा आपला बालेकिल्ला मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेसला अखेरचा दंडवत घालत सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मतदारसंघ अधिक सुरक्षित झाला आहे. हेच गणित लक्षात घेत शिवसेनेचे ‘युवराज’ आदित्य ठाकरे वरळीमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
समस्या
- वाहतूक कोंडी
- झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प
- बीडीडीचा पुनर्विकास
- उपकरप्राप्त इमारतींचा प्रश्न
शिवडी
एकेकाळी लालबाग, काळाचौकी, अभ्युदय नगर, परळ, शिवडी हा अस्सल मराठमोळा भाग. मराठमोळ्या मतदारांच्या पाठिंब्यामुळे हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला बनला. संपानंतर गिरण्यांना घरघर लागली. अनेक कामगारांनी मुंबईला रामराम ठोकला आणि गावची वाट धरली. गेल्या काही वर्षांमध्ये पुनर्विकासात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आणि अमराठी टक्का वाढत गेला.
पूर्वाश्रमीच्या परळ विधानसभा मतदारसंघात १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेनेचे दगडू सकपाळ विजयी झाले. मतदारसंघांच्या पुनर्रचनेत माझगावचा काही भाग परळ मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला आणि शिवडी मतदारसंघ उदयास आला. विधानसभेच्या २००९च्या निवडणुकीत शिवडी मतदारसंघातून दगडू सकपाळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली. मात्र दगडू सकपाळ यांचा पराभव करून मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर विधानसभेत गेले. शिवसेनेने २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिवडीतून विभागप्रमुख अजय चौधरी यांना उमेदवारी दिली. मनसेचे बाळा नांदगावकर यांचा पराभव करून अजय चौधरी विजयी झाले आणि शिवडीवर पुन्हा भगवा फडकला.
समस्या
- ‘झोपु’ योजना, म्हाडा वसाहतीसह खासगी इमारतींचा पुनर्विकास ऐरणीवर
- टाटा रुग्णालयाबाहेर रस्त्यावरच रुग्णांच्या नातेवाईकांचा ठिय्या
- परळ, करिरोड पूल पाडून टाकल्यामुळे वाहतूक कोंडी
मलबार हिल
दक्षिण मुंबईमधील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळख बनलेल्या मलबार हिल परिसरात १९८० ते १९९५ या काळात काँग्रेसचा तिरंगा फडकत होता. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात १९९५च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले. भाजपचे मंगल प्रभात लोढा १९९५ मध्ये या मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर १९९९, २००४च्या निवडणुकीत विजय मिळवित मंगल प्रभात लोढा यांनी हॅट्ट्रिक साधली.
विधानसभेच्या २००९च्या निवडणुकीपूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्या वेळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा ऑपेरा हाऊस मतदारसंघ मलबार हिल मतदारसंघात विलीन झाला. त्यामुळे मलबार हिल मतदारसंघ शिवसेना-भाजप युतीत कळीचा मुद्दा बनला होता. मात्र शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील अंतर्गत वाद त्याच वेळी उफाळून आला. अखेर ‘मातोश्री’ने हा मतदारसंघ भाजपच्या झोळीत टाकून अंतर्गत वादाला पूर्णविराम दिला. मागील निवडणुकीत (२०१४) युती संपुष्टात आली आणि शिवसेना-भाजपने स्वबळावर निवडणूक लढविली. मात्र अमराठी मतांच्या जोरावर २०१४च्या विधानसभा निवडणुकीत मंगल प्रभात लोढा यांनी हा मतदारसंघ आपल्याकडे राखला.
आजघडीला भाजपचा सुरक्षित मतदारसंघ म्हणूनच मलबार हिलकडे पाहिले जाते.
या मतदारसंघातील गिरगाव, ग्रॅण्टरोड, ताडदेव परिसरात दाटीवाटीने उभ्या असलेल्या असंख्य चाळींमध्ये राहणारा मध्यमवर्गीय, तर मलबार हिल, नेपिअन्सी रोड आदी परिसरांतील उच्चभ्रू मतदार असे संमिश्र चित्र येथे आहे. एकेकाळी गिरगाव, ग्रॅण्टरोड आणि आसपासचा परिसर अस्सल मराठमोळा म्हणून ओळखला जात होता. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये विविध कारणांनी मराठी टक्का घसरला आणि अमराठी मतदारांची संख्या वाढत गेली. त्याचाही फटका शिवसेनेला बसू लागला आहे. या भागात काँग्रेसचे नेतृत्व औषधालाही उरलेले नाही. त्याचाही भाजपला लाभ होऊ लागला आहे.
समस्या
- धोकादायक इमारतींचा रखडलेला पुनर्विकास
- ‘मेट्रो-३’च्या कामामुळे वाहतुकीचा उडालेला बोजवारा
- धोकादायक पुलांचा प्रश्न
कुलाबा
मुंबईच्या एका टोकाला असलेला कुलाबा विधानसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. विधानसभेच्या १९९५च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारून तो काबीज केला. तथापि, २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अॅनी शेखर यांनी विजयश्री खेचून आणत गमावलेला गड काँग्रेसला मिळवून दिला. मागील विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून रुसवे-फुगवे टिपेला पोहोचले आणि शिवसेना-भाजपची युती तुटली. भाजपने कुलाब्यात राज के. पुरोहित यांना, तर शिवसेनेने पांडुरंग सकपाळ यांना उमेदवारी देत परस्परांना आव्हान दिले. काँग्रेसने अॅनी शेखर यांना पुन्हा रिंगणात उतरविले. मोदी लाटेच्या प्रभावात अॅनी शेखर तग धरू शकल्या नाहीत आणि राज के. पुरोहित ५२ हजार ६०८ मते मिळवून विजयी झाले. सकपाळ २८ हजार ८२१ मते मिळवित दुसऱ्या स्थानावर होते. सलग दोन वेळा विजयी झालेल्या काँग्रेसच्या अॅनी शेखर २० हजार ४१० मते मिळवून तिसऱ्या स्थानावर गेल्या.
समस्या
- कोळीवाडय़ांतील नागरी सुविधांचा विकास
- मोडकळीस आलेल्या चाळींचा प्रश्न
- म्हाडाच्या संक्रमण
- शिबिरातील अस्वच्छता
- अपुरा पाणीपुरवठा
- वाहतूक कोंडीची समस्या
- फेरीवाल्यांचे अतिक्रमण
मतदार म्हणतात,
मुंबादेवी मतदारसंघात दाटीवाटीने अनेक इमारती उभ्या आहेत. साधारण शंभर वर्षांपूर्वीच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे या भागात पुनर्विकासाने कास धरली आहे. पण मर्जी आणि स्वार्थ बाळगून पुनर्विकास सुरू आहे. काही ठिकाणी जाणीवपूर्वक वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जाते. त्याचा फटका सर्वसामान्य रहिवाशांना बसतो. – शैलेश धोत्रे, व्यावसायिक,
इमारतींच्या पुनर्विकासाच्या फे ऱ्यामुळे गिरगाव आणि आसपासच्या परिसरातील मूळ संस्कृती लोप पावली आहे. टोलेजंग इमारतींमध्ये घर घेणे मध्यमवर्गीय गिरगावकरांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. मूळ संस्कृतीत वाढलेल्या जुन्या गिरगावकरांना नव्या संस्कृतीशी जुळवून घेणे दिवसेंदिवस अवघड बनत आहे. मूळ रहिवाशांकडे पाठ फिरवून विकासाची कास धरली जात आहे. – प्रा. सुहास लिमये, निवृत्त मुख्याध्यापक, रहिवाशी
गिरगाव परिसरातील चाकरमान्यांसाठी महत्त्वाचा असा चर्नी रोड रेल्वे स्थानकाबाहेरील (पूर्व) पादचारी पूल पालिकेला अद्याप पूर्ण करता आलेला नाही. एका बाजूने नवा पूल खुला केला असला तरी त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विकासकामांमुळे वाढते प्रदूषण, रस्त्यांची दुर्दशा, धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष अशा समस्यांमुळे रहिवाशी त्रस्त आहेत.– संध्या बहाडकर, सामाजिक कार्यकर्त्यां