स्थायी समितीचा धडाका सुरूच; दोन दिवसांत नऊशे कोटींचे प्रस्ताव मार्गी
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता चार-पाच दिवसांत लागू होण्याची शक्यता गृहीत धरून मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने कामे मंजुरीचा सपाटाच लावला आहे. पाचशे कोटी रुपयांच्या दीडशे कामांना सोमवारी मंजुरी देणाऱ्या पालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी आणखी चारशे कोटींच्या ५० हून अधिक प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवला. यामध्ये रस्ते, जलवाहिन्या दुरुस्तीसह अन्य काही प्रस्तावांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील स्थायी समितीच्या सोमवारच्या बैठकीत सत्ताधारी शिवसेनेने ५०० कोटी रुपये कामांच्या तब्बल १५४ प्रस्तावांना मंजुरी दिली. स्थायी समितीची पुढील बैठक बुधवार, ११ सप्टेंबर रोजी आयोजित करण्याची घोषणा सोमवारच्या बैठकीत करण्यात आली. एकाच आठवडय़ात आयोजित करण्यात आलेल्या स्थायी समितीच्या दुसऱ्या बैठकीत ५० हून अधिक प्रस्ताव सादर करण्यात आले होते. अवघ्या १५ ते २० मिनिटांमध्ये तब्बल चारशे कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कामांचे हे प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंजूर केले. काही प्रस्ताव पुकारताच सदस्यांनी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र यशवंत जाधव यांनी प्रस्ताव पुकारून ते मंजूर करण्याचा सपाटाच लावला होता. स्थायी समिती अध्यक्ष बोलण्याची संधी देत नसल्यामुळे विरोधकच नव्हे तर भाजपचे नगरसेवकही अस्वस्थ झाले होते.
इंडिया युनायटेड मिल क्रमांक २ व ३ मध्ये उभारण्यात येणारे वस्त्रोद्योग संग्रहालय हा शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पातील टप्पा क्रमांक १, तळ्यामध्ये मल्टिमीडिया संगीत कारंजे, ध्वनी व रोषणाई कार्यक्रमाची संकल्पना, प्रस्थापना, प्रचलन आणि परिरक्षणाच्या कामाच्या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर सफाई कामगारांच्या सेवा निवासस्थानाच्या पुनर्विकासाच्या कामाचा प्रस्ताव मंजूर करून कामगारांची मने जिंकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर अशा प्रस्तावांना मंजुरी देणे शक्य झाले नसते. त्यामुळे या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
मंजुरी मिळालेली कामे
जलवाहिन्या बदलणे वा दुरुस्ती, रस्त्यांची दुरुस्ती, सुका कचरा वाहून नेण्यासाठी कंत्राट पद्धतीने वाहने घेणे, सफाई कामगारांच्या सेवा निवासस्थानांचा पुनर्विकास, वस्त्रोद्योग संग्रहालय, पाण्याची गळती, दूषितीकरण रोखण्यासाठी हाती घेण्यात येणारी कामे, शाळांची दुरुस्ती, दिव्यांग व्यक्तींना झेरॉक्स यंत्र देणे, भाडेतत्त्वावर फिरती शौचालये घेणे, बेस्ट उपक्रमाची इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेन्ट सिस्टीम.