मुंबई : अरबी समुद्रातील तौक्तेचक्रीवादळाच्या पाश्र्वाभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणात सतर्कतेचे आदेश दिले आहेत. किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसेच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास दिल्या आहेत. वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन महावितरण कं पनीने अधिक कर्मचारी तैनात के ले असून, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तौक्ते चक्रीवादळ कोकण किनाऱ्यावर येण्याची शक्यता असून, वेगवान वादळासह मुसळधार पावसाचा मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनास सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत प्रशासनास दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या.

विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकारी यांनी सज्ज राहावे व मनुष्यबळ तसेच साधनसामुग्री तयार ठेवावी असेही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. त्यानुसार कोकणातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राज्य आपत्ती निवारण कक्ष असून या वादळामुळे पाऊस आणि वारा याचा फटका बसण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून किनाऱ्याजवळच्या गावातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या आणि त्यांना सर्व सुविधा पुरविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी दिली.

रायगड जिल्ह्यात खबरदारी

अलिबाग :  हे वादळ कोकण किनारपट्टीवरून रविवारी गुजरातच्या दिशेने सरकरण्याची शक्यता आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळाच्या परिस्थितीत नागरीकांनी घराबाहेर पडू नये आणि सखल भागातील नागारीकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे असा आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vigilance orders in konkan akp
First published on: 16-05-2021 at 01:15 IST