मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी एक, विहार तलाव सोमवारी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. सद्यस्थितीत सातही धरणांचा एकूण पाणीसाठा ९१.१८ टक्क्यांवर पोहोचला असून त्यात आता वाढ होऊ लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने पाणीसाठा ८९ टक्क्यांवर स्थिरावला होता.
मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी असून आता धरणांमध्ये १३ लाख १९ हजार ६४० दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे धरणांचा पाणीसाठा ८९ टक्क्यांवर स्थिरावला होता. मात्र, मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, विहार तलाव सोमवारी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे. विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता २७,६९८ दशलक्ष लीटर एवढी आहे. हा तलाव गतवर्षी म्हणजे २५ जुलै २०२४ रोजी मध्यरात्री ३.५० वाजता भरला होता. तसेच, २०२३ मध्ये २६ जुलै रोजी रात्री १२.४८ वाजता, २०२२ मध्ये ११ ऑगस्ट रोजी आणि २०२१ मध्ये १८ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता.
सद्यस्थितीत सातही धरणांमध्ये मिळून ९१.१८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. ऊर्ध्व वैतरणामध्ये ८७.१३ टक्के, मोडकसागरमध्ये ८६.६१ टक्के, तानसामध्ये ९८.८१ टक्के, मध्य वैतरणामध्ये ९७.३४ टक्के, भातसामध्ये ८९.८२ टक्के, विहारमध्ये ९५.१६ टक्के, तुळशीमध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे.