मुंबईची कूळकथा

नालासोपाऱ्याचा आजचा २१व्या शतकातील परिचय म्हणजे मुंबईच्या उत्तर टोकाला पश्चिम रेल्वेच्या विरार पूर्वीचे स्थानक. पण हेच नालासोपारा इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकातील राजधानीचे शहर होते. सम्राट अशोकाचा शिलालेखही नालासोपाऱ्यात सापडला असून तो सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात विराजमान आहे. अर्थात त्या वेळेस या ठिकाणाचे नाव होते शूर्पारक (शूर्पारक > सूर्पारक > सोपारक > सोपारा). खाडीचे पाणी आतपर्यंत येणारा भाग आपल्याकडे ‘नाला’ म्हणून ओळखला जातो त्यामुळे नालासोपारा. असा हा आजवरचा प्रवास आहे. इसवीसनपूर्व शतकांपासून हे जगातील महत्त्वाच्या आणि मोठय़ा बंदरांपैकी एक राहिले आहे. म्हणूनच त्याचा संदर्भ जगभरातील अनेक प्रवाशांच्या नोंदींमध्ये सापडतो. त्याचप्रमाणे भारतातील अनेक लेणींमध्ये असलेल्या शिलालेखांमध्ये नालासोपाऱ्याचा उल्लेख येतो. कधी इथून आलेल्या बौद्ध भिक्खूंच्या नावाच्या संदर्भात तर कधी येथील प्रसिद्ध व्यापाऱ्याने दिलेल्या दानांच्या संदर्भात. हे सर्व उल्लेख शूर्पारक किंवा सोपारा हे भारतातील सर्वाधिक महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक होते, याकडेच निर्देश करतात.

सोपाऱ्याच्या या शोधाला सुरुवात झाली ती १८८१ सालच्या डिसेंबर महिन्यात बॉम्बे गॅझेटिअरच्या नोंदी करणाऱ्या जेम्स कॅम्पबेल यांनी पंडित भगवानलाल इंद्रजी यांना पाठविलेल्या ‘बुरुड राजाचा किल्ला’ या संदर्भातील नोंदी आणि रेखाटनांमुळे. ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डब्लू. बी. मुलोक यांच्यामुळे या नोंदी मिळणे इंद्रजी यांना शक्य झाले. तत्पूर्वी मुलोक यांना जमिनी दान दिल्याचा शिलाहारकालीन संदर्भ असलेले काही गधेगळ सापडले होते. बुरुड राजाचा किल्ला म्हणजे बौद्ध स्तूपच असल्याचे इंद्रजी यांना रेखाटनांवरून लक्षात आले. तत्पूर्वी सोपाऱ्याचा उल्लेख नाशिक, कार्ले, जुन्नर, नाणेघाट, कान्हेरी येथील शिलालेखांमध्ये असल्याची माहिती ज्ञात होती. फक्त पुरावे सापडत नव्हते.

७ फेब्रुवारी १८८२ रोजी कॅम्पबेल आणि इंद्रजी सोपाऱ्याला पोहोचले. तिथे त्यांना ब्रह्माची टेकडी म्हणून परिचित असलेल्या वकाला परिसरात तीन छोटेखानी शिलालेख सापडले आणि बुरुड राजाचा किल्ला म्हणजे स्तूपच आहे, याची खात्री पटली. शिवाय काही इतर पुरावशेषही हाती लागले. मात्र त्या दिवशी स्तूपाचे उत्खनन शक्य नव्हते. ते नंतर ७ ते १० एप्रिल या चार दिवसांत पूर्ण करण्यात आले. या उत्खननामध्ये सापडलेल्या अवशेषांमुळे सोपाऱ्याचे इसवीसनपूर्व अस्तित्व सिद्ध झाले. केवळ भारतातच नव्हे तर युरोपात आणि बौद्ध प्रभाव असलेल्या सिलोन अर्थात आताच्या श्रीलंकेमध्येही त्याची चर्चा झाली. अनेक बौद्धकथांमध्ये सोपाऱ्याचा उल्लेख हा गौतम बुद्धाने भेट दिलेल्या पवित्र स्थानांमध्ये येतो. त्यामुळे साहजिकच होते की, श्रीलंकेतील प्रमुख बौद्ध भिक्खू एच. सुमंगल यांनी थेट ब्रिटिश सरकारला पत्र लिहून गौतम बुद्धाने भेट दिलेल्या या शहरातील पुरावस्तू अतिमहत्त्वाच्या असल्याने श्रीलंकेतील बौद्ध मठासाठी मिळाव्यात अशी विनंती केली ती ब्रिटिश सरकारने मान्यही केली. तसे आदेश मुंबई इलाख्याच्या गव्हर्नरना जारी केले. येथून हे बौद्ध अवशेष वाजतगाजत मिरवणुकीने एका विशेष बोटीने श्रीलंकेस रवाना झाले. तिथे झालेल्या आगतस्वागताच्या सोहळ्याची नोंद सुमंगल यांनी इंद्रजी यांना पाठविलेल्या पत्रात वाचायला मिळते.

श्रीलंकेतील अडम्स पीक बौद्ध मठामध्ये हे अवशेष पोहोचले त्या वेळेस सण साजरा करण्यात आला. श्रीलंकेतील विद्य्ोदन कॉलेजमध्ये ते अवशेष सामान्य जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले. या पत्राअखेरीस सुमंगल म्हणतात, आता येणाऱ्या काळात तुम्ही बौद्ध स्तूपाबद्दलही इतरही नवीन प्रकाशात आलेली माहिती आम्हाला पाठवाल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आम्हाला याचे ऐतिहासिक महत्त्व आधिक्याने कळेल. तसेच आमच्याकडे असलेल्या बौद्ध पोथ्यांमध्ये येणारे सोपाऱ्याचे संदर्भ आम्ही आपणाला पाठवून देऊ. १७ ऑक्टोबर १८८२ रोजी हे पत्र त्यांनी इंद्रजी यांना लिहिलेले होते.

श्रीलंकेचा आणि सोपाऱ्याचा घनिष्ठ संबंध हा इथेच सुरू होत नाही तर तो पार सम्राट अशोकाच्या कालखंडापर्यंत मागे जातो. कारण सम्राट अशोकाने बौद्ध धर्म प्रसाराचा निर्णय बौद्ध संगितीमध्ये घेतल्यानंतर त्याचा मुलगा महिंद आणि त्याची मुलगी भिक्खूनी संघमित्रा या दोघांनाही श्रीलंकेला पाठविले. या दोघांनी त्यांच्या श्रीलंका प्रवासाची सुरुवात शूर्पारक या जगप्रसिद्ध बंदरातून केली, असा उल्लेख श्रीलंकेतील पाली बौद्ध साहित्यामध्ये आहे. एवढेच नव्हे तर गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली बोधी प्राप्त झाली, त्याची फांदी संघमित्रा हिने श्रीलंकेत नेली. आजही तो वृक्ष श्रीलंकेत बहरतो. आता महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडील बोधीवृक्ष सुकल्यानंतर भारत सरकारने श्रीलंकेतून त्या वृक्षाची फांदी आणून ती बोधगयेत लावली आणि तो वृक्ष आजही बहरतो आहे! म्हणून केवळ बौद्ध इतिहासातच नव्हे तर भारताच्या इतिहासातही नालासोपाऱ्याला अर्थात प्राचीन शूर्पारकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

विनायक परब vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab