मालाड मालवणी मधील विषारी दारूकांडातील मृतांच्या कुटूंबीयांना १ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येईल अशी घोषणा उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने मृत कुटूंबीयांच्या नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.
मालवणीमधील विषारी दारूकांडात बळी पडलेल्या मृतांच्या कुटूंबीयांची श्री तावडे यांनी अली तलाव गावदेवी मंदीर, लक्ष्मीनगर आदी भागात जावून त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. मृत कुटूंबीयांचे त्यांनी सांत्वन केले. या विषारी दारुकांडाला जबाबदार असलेल्या दोषीं विरूद्ध कडक कारवाई करण्याची आग्रही मागणी मृतांच्या कुटूंबीयांनी तावडे यांच्याकडे केली. या संदर्भात कोणत्याही दोषीला पाठीशी घातले जाणार नाही, पोलिस अधिकारी, उत्पादन शुक्ल अधिकारी आणि अजून कोणीही दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल असे तावडे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या दुर्दैवी कुटूंबीयातील कर्ता पुरूष विषारी दारुकांडामध्ये मृत पावला आहे त्यामुळे या कुटूंबातील एखाद्या व्यक्तीला रोजगार उपलब्ध होवून त्यांना छोटे मोठे उत्पन्नाचे साधन निर्माण होईल यासाठी सरकार प्रयत्न नक्कीच करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येणारी मदत तातडीने देण्याचे आदेश श्री तावडे यांनी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सोमवारी या संदर्भात मृतांच्या कुटूंबीयांची कागदपत्र तपासणी करून त्यांना प्रत्यक्ष मदत देण्यात येईल. त्याच प्रमाणे ज्या मृतांच्या कुटूंबीयामध्ये शिक्षण घेणारी मुले आहेत त्यांना शिक्षणासाठी मदत करण्या बाबत सरकार विचार करेल असेही त्यांनी सांगितले.
या भेटी पुर्वी श्री तावडे यांनी अतिरीक्त पोलिस आयुक्त फतेहसिंग पाटील, जिल्हाधिकारी शेखर चेन्ने तसेच उत्पादन शुल्क आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची श्री तावडे यांनी एक आढावा बैठक घेतली. सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देतानाच या भागातील दारू भट्ट्या उखडून टाका असे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले. या प्रसंगी राज्यमंत्री विद्या ठाकूर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, भाजप जिल्हाध्यक्ष जे. पी. मिश्रा आदी उपस्थित होते.