मुंबई: मतदार यादीमध्ये दुबार मतदार असून याबाबत सत्ताधाऱ्यांसह आम्ही विरोधी पक्षांचे नेतेही बोलत आहोत. मग निवडणूक घेण्याची घाई कशाला? पाच वर्षे निवहणुका झाल्या नाहीत, आणखी एक वर्षे नाही झाल्या तर काय फरक पडणार आहे, आधी मतदार याद्या साफ करा, याद्या पारदर्शक करा आणि मग निवडणुका घ्या, अशी जोरदार मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. निवडणूक आयोगाची कारस्थाने बघितल्यावर अशा निवडणूक न लढविलेल्या बऱ्या अशी म्हणण्याची वेळ आल्याची भावनाही ठाकरे यांनी व्यक्त केली.

आजचा मोर्चा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा, दिल्लीपर्यंत समजावून सांगण्याचा आहे, असे सांगतानाच राज ठाकरे यांनी यावेळी कोणत्या मतदारसंघात किती दुबार मतदार आहेत याची यादीही वाचून दाखवली. हे सर्व दुबार मतदार असून महाराष्ट्रात काय गोंधळ सुरू आहे हे यावरून दिसत असल्याचा आरोप केला. एवढे पुरावे दिल्यानंतरही न्यायालयाचा आदेश आहे म्हणत निवडणुका घ्यायचा हट्ट सुरू आहे. जुलैपर्यंतची यादी अंतिम आहेत यात जी माणसे भरली आहेत त्यानुसार निवडणुका आटोपून घ्यायच्या आणि यश पदरी पाडायचे. याला काय निवडणुका म्हणतात? याच्यातून लोकशाही कशी टिकेल, असा संतप्त सवाल त्यांनी केला. सगळी कारस्थाने निवडणूक आयोगाच्या मार्फत सुरू असून उन्हा-तान्हात रांगेत उभा राहून मतदान करणाऱ्याचा हा अपमान आहे. मतदारांनी मतदान नोंदवायचे, पण मॅच अगोदरच फिक्स आहे. मग त्याच्या मताला काय किंमत आहे? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

विधानसभा निवडणुकीत कल्याण, भिवंडी, डोंबिवलीतील मतदारांनी पुन्हा मलबार हिल भागात मतदान केल्याचा दावा राज ठाकरे यांनी करीत याचे पुरावेच सादर केले. यावेळी राज ठाकरे यांनी सभेसाठी मंचासमोर महाराष्ट्रात असलेल्या दुबार मतदारांच्या याद्यांचे गठ्ठेच आणून ठेवले होते. या दुबार मतदारांची संख्याच त्यांनी यावेळी सर्वांसमोर आणली.

असे आहेत दुबार मतदार., राज ठाकरे यांचा आरोप

  • मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात १७ लाख २९ हजार ४५६ मतदार, यापैकी ६२ हजार ३७० हे दुबार मतदार.
  • मुंबई वायव्य मतदारसंघात १६ लाख ७६ हाजर ८६१ मतदार, यापैकी ६० हजार २३१ दुबार मतदार.
  • मुंबई ईशान्य मतदारसंघात १५ लाख ९० हजार ७१० मतदार, यापैकी ९२ हजार ९८३ दुबार मतदार.
  • मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात १६ लाख ८१ हजार ४८ मतदार ६३ हजार ७४० दुबार मतदार.
  • मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात १४ लाख ३७ हजार ६७६ मतदार ५० हजार ५६५ दुबार मतदार.
  • मुंबई दक्षिण मतदारसंघात १५ लाख १५ हजार ९९३ मतदार , ५५ हजार २०५ दुबार मतदार.
  • नाशिक लोकसभा मतदारसंघात १९ लाख ३४ हजार ३४९ मतदार, त्यापैकी ९९ हजार ६७३ दुबार मतदार.
  • मावळ लोकसभा मतदारसंघात १९ लाख ८५ हजार १७२ मतदार, त्यापैकी १ लाख ४५ हजार ६३६ दुबार मतदार.
  • पुणे लोकसभेत मतदारसंघात १७ लाख १२ हजार २४२ मतदार, त्यापैकी १ लाख २ हजार ०२ दुबार मतदार.
  • ठाणे लोकसभेत २ लाख ९ हजार ९८१ दुबार मतदार आहेत.