मुंबई : या जगात टाकाऊ असे काहीच नसते. टाकाऊतून संपत्ती निर्माण करण्यासाठी कल्पकता आणि दृष्टी असावी लागते. कार्यकर्ते कधी टाकाऊ नसतात. नेता किती चांगला आहे, यावर कार्यकर्त्यांचा उपयोग कसा करायचा हे ठरते. तंत्रज्ञान आणि नेतृत्वाचा योग्य वापर केला, तर टाकाऊतूनही संपत्ती उभी करता येते, असा विश्वास व्यक्त करीत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईच्या प्रदूषणमुक्तीचा मंत्र राज्य सरकारला दिला.

मुंबईच्या प्रदूषणमुक्तीचे आव्हान पेलण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे व लोकशिक्षणही केले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादनही त्यांनी केले.

मुंबईच्या बोरिवली उपनगरातील गोराई येथे उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या ‘कांदळवन उद्याना’चे भूमिपूजन शुक्रवारी बोरिवली येथील अटल स्मृती उद्यानाच्या सभागृहात गडकरी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी बोलताना गडकरी यांनी मुंबईच्या प्रदूषणमुक्तीचे एक सुंदर स्वप्नचित्रच श्रोत्यांसमोर उभे केले आणि ‘अटल इच्छाशक्ती’ असेल तर हे स्वप्न साकारण्यात कोणतीच अडचण नाही, असा विश्वासही दिला.

टाकाऊपासून संपत्ती निर्माण करणे हे आता केवळ स्वप्न राहिलेले नाही. हे स्वप्न मी स्वत: कृतीत उतरविले असल्याने मला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. इथेनॉलपासून बायोप्लास्टिकदेखील बनविता येणार असल्याने प्लास्टिक, मैलापाणी यांमुळे होणारे प्रदूषण रोखणेही शक्य होणार आहे.  दिल्लीला प्रदूषणाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांची फळे आता दिसू लागली आहेत. शहरात राबविलेल्या ५५ हजार कोटींच्या योजनेमुळे दिल्लीचे प्रदूषण २९ टक्क्य़ांनी कमी झाले आहे. आपण दिल्लीसाठी जे काम केले, ते मुंबईसाठी करू शकलो नाही याची मला खंत आहे. सांडपाणी व मैलापाण्यामुळे मुंबईचा सुंदर समुद्र किळसवाणा झाला आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याच्या कल्पना अमलात आणल्या, तर मुंबईचा समुद्र मॉरिशससारखा नितळ होईल. घनकचरा आणि द्रवकचरा व्यवस्थापनाच्या वेगळ्या कल्पना राबवून मुंबईची प्रदूषणमुक्ती सहज शक्य आहे. नागपूरमध्ये मैलापाणी महाराष्ट्र सरकारला विकून १८० कोटींची रॉयल्टी नागपूर महापालिकेस मिळत असून त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘बायोडायजेस्टर’द्वारे मिथेननिर्मितीचा प्रकल्पही सुरू होणार आहे, असे गडकरी म्हणाले. या मिथेनमधून सीओ-२ वेगळा करून त्यावर नागपुरातील साडेचारशे बसगाडय़ा धावतील, तर मटन-मच्छी आणि टाकाऊ भाजीपाला, शौचालयांतील मैला आदींचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या बायो-सीएनजीवर पाच हजार ट्रक चालविता येतील, असा दावाही गडकरी यांनी केला. महापालिकेचे ५८ हजार कोटी रुपये मुदत ठेवींमध्ये असताना मुंबई पावसाळ्यात पाण्यात जाते याबद्दल खंत व्यक्त करून, मुंबई महापालिकेने अशा प्रकल्पांसाठी पुढे आले पाहिजे, असे सांगत त्यांनी महापालिका प्रशासनासही टोला लगावला.

कोरा केंद्र प्रकल्पासाठी १०० कोटी

बोरिवलीतील कोरा केंद्रच्या जागेत गांधीजींच्या विचारावर आधारित बहुउद्देशीय प्रकल्प व सुसज्ज इस्पितळ प्रकल्प उभारण्याची मागणी बोरिवलीचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी संसदेत केली होती. गुरुवारी या कार्यक्रमात बोलताना शेट्टी यांनी त्याचा पुनरुच्चार केला आणि गडकरी यांनी आपल्या भाषणात या मागणीबाबतची सकारात्मकता स्पष्ट केली. महात्माजींच्या दीडशेव्या जयंती सोहळ्याआधी हा प्रकल्प पूर्ण करण्याकरिता केंद्र सरकार संपूर्ण सहकार्य करेल, असे स्पष्ट करून, आपल्या खात्यातर्फे या प्रकल्पाकरिता १०० कोटी रुपये देण्यात येतील, असेही गडकरी यांनी जाहीर केले.

मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर भव्य उद्यान..

सिंगापूरच्या धर्तीवर मुंबईच्या पूर्व किनारी भागात साडेआठशे हेक्टर जमिनीवर बगिचा करण्याचा संकल्प आहे. हा बगिचा तयार झाला की मुंबईकरांना प्रदूषणमुक्त स्वच्छ हवेचा मोकळा श्वास घेता येईल. कचरा किंवा घाण पाण्याचा योग्य वापर करून त्यापासून संपत्ती निर्माण करणे शक्य आहे असे एकदा सिद्ध झाले, की ती घाण न राहता त्यावर हक्क सांगण्यासाठी अनेक जण पुढे येतील, असा दावाही गडकरी यांनी केला. बकाल मुंबई हे आपले भविष्यातील स्वप्न नाही.

२० मिनिटांत जलमार्गे विमानतळ..

नवी मुंबईत होणाऱ्या विमानतळावर मुंबई परिसरातील प्रवासी रस्त्यामार्गे नव्हे, तर जलमार्गे जातील. संजय भाटिया यांनी त्यासाठीचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले असून जेव्हा हा विमानतळ तयार होईल तेव्हा केवळ मुंबईच नव्हे, तर वसई-विरार व भिवंडीपासूनचे प्रवासी वॉटर टॅक्सीमार्गे वीस ते तीस मिनिटांत विमानतळावर पोहोचतील, असे गडकरी यांनी जाहीर केले.