मुंबई: सोमवारच्या पावसामुळे मुंबईतील जवळपास प्रत्येक भाग पाण्याखाली गेला. त्यातच मलबार हिल सारख्या उच्चभ्रू परिसरातील इमारतीनाही याचा फटका बसला. मलबार हिल हा परिसर दक्षिण मुंबईच्या एका टोकाला वसलेला असून उंच टेकडीवर हा भाग आहे. या परिसरात कधी पावसाचे पाणी तुंबत नाही. मात्र लाल मातीचा हा परिसर असल्यामुळे माती भुसभूशीत होऊन जमीन खचण्याच्या घटना इथे घडतात. अत्यंत उच्चभ्रू म्हणून हा परिसर ओळखला जातो. सोमवारच्या पावसाचा या परिसरालाही फटका बसला.
येथील काही इमारतीच्या आवारात पाणी साचले होते. नेपीयन्सी रोड येथे संरक्षक भिंत कोसळल्यामुळे भिंती पलीकडून पाण्याचा मोठा लोट परिसरात आला. त्यामुळे गोदरेज बाग, मलबार अपार्टमेंट या इमारतीच्या आवारात पाणी साचले.
तसेच सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मलबार हिल येथून पाणी प्रचंड वेगाने खालच्या सखल भागात येत होते. त्यामुळे केम्पस कॉर्नर, नानाचौक, ताडदेव, ग्रॅण्टरोड स्थानक या परिसरात पाणी साचले होते.मलबार हिल परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाची कामे सुरु असून टेकडीला किती भार सोसेल याचा विचारच केला जात नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.