सिंचन प्रकल्पांच्या सुमारे ६०० कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाला मंजुरी दिल्यावर सिंचनाचे पाणी उद्योगांकडे वळविताना रायगड, पुणे परिसरातील बडय़ा राजकीय नेत्यांच्या प्रभाव क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले आहे. सुमारे १६ हजार हेक्टर्स क्षेत्राचे पाणी उद्योगांबरोबरच घरगुती वसाहती आणि दुग्धविकास प्रकल्पांना दिले जाईल.
राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत ३३ उद्योग आणि सात पाणीपुरवठा योजनांसाठी पाण्याचे आरक्षण ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हे पाणी वळविताना राष्ट्रवादीला झुकते माप मिळाले आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंचनाच्या सुमारे ६०० कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या वाढीव प्रस्तावांना मान्यता देण्यात आली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दल राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आक्षेप घेतल्यावर हे दोन निर्णय राष्ट्रवादीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे आहेत.
उद्योगांना पाणी देताना जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या रायगड जिल्ह्य़ातील सर्वाधिक नऊ प्रस्तावांचा समावेश आहे. त्यात एका गृहनिर्माण प्रकल्पाचा समावेश आहे. पवार कुटुंबीयांचे मूळ गाव असलेल्या काटेवाडीतील बारामती अॅग्रो प्रा., पिंपळी, मौजे काटेवाडी व याच कंपनीच्या पुरंदर तालुक्यातील कारखान्याला पाणी देण्यात आले आहे. पुणे जिल्ह्य़ातील पाच प्रकल्पांना पाणी देण्यात आले आहे. फलटण तालुक्यातील गोविंद मिल्क प्रॉडक्ट ही कंपनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांच्या नातेवाईकांशी संबंधित आहे. बीड जिल्ह्य़ातील माजलगाव तालुक्यातील सुंदरराव सोळंके टेक्स्टाइल पार्क ही कंपनी माजी राज्यमंत्री व राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्य़ातील खटाव तालुक्यातील तीन औद्योगिक वसाहतींसाठी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे.
घरगुती पाणी योजनांसाठी ठेवण्यात आलेल्या अरक्षणामध्ये ठाणे, सातारा, नागपूर, पुणे आणि बुलढाणा जिल्ह्य़ांतील पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. तटकरे यांच्यामुळे पाणी आरक्षणात रायगड जिल्ह्य़ावर कृपादृष्टी दाखविण्यात आली आहे. मात्र मे. गारनेट कन्स्ट्रक्शन या बिल्डरसाठी पाणी का राखीव ठेवण्यात आले हे कोडेच आहे. पाण्याचे आरक्षण ठेवण्यात आलेले बहुतांशी कारखाने बडय़ा राजकारण्यांशी संबंधित असल्याची कुजबुज मंत्रालयात सुरू होती.
नेत्यांचा प्रभाव
पवार कुटुंबीय, पृथ्वीराज चव्हाण, सुनील तटकरे, रामराजे निंबाळकर, आमदार प्रकाश सोळंके