मालाडमधील आप्पापाडा, कांदिवलीतील क्रांतिनगर भागातील लाखों रहिवाशांना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. या भागात गेले सलग दोन दिवस पाण्याची मोठी कपात करण्यात येत आहे. घरातील पाण्याचा साठा संपल्याने कधी नव्हे तो या वस्तीत टँकर मागवावा लागत आहे.
मालाडमधील आप्पापाडा, तसेच कांदिवलीतील क्रांतिनगर भागातील वस्त्यांवर गेले दोन दिवस पाण्याचा पुरवठा खंडित झाला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. सलग दोन दिवस या भागात पाणीच आलेले नाही. घरातील पाण्याचा साठाही संपल्याने आता फक्त पिण्यासाठी पाणी मिळाले तरी पुरे, या विचाराने येथील रहिवाशी हंडा, कळशा घेऊन पाण्यासाठी वणवण करीत आहेत. महापालिकेच्या नळासमोर रहिवाशांच्या लांबच लांब रांगा पाहावयास मिळत आहेत. ‘आम्ही गेले वीस वर्षे येथे राहत आहोत. मात्र यापूर्वी पाण्यासाठी कधीही अशी वणवण आम्ही केली नव्हती. पण आता लांबून चालत हंडा-कळश्या, बादल्या वाहवत पाणी आणावे लागत आहे,’ असे येथील एका रहिवाशाने सांगितले. पालिकेचे अधिकारी दोन दिवसात येथील स्थिती पूर्ववत होईल असे सांगत आहेत.
मात्र, तोपर्यंत आम्ही पाण्यासाठी कुठे वणवण करायची, असा सवाल रहिवासी करत आहेत. ‘पाणी कपातीमुळे येथील रहिवाशांना होणारा नागरिकांच्या त्रासाबाबत आम्ही समजू शकतो. मात्र पाण्याच्या वाहिन्या दुरुस्त केल्या नाहीत तर त्याचा त्रासही भविष्यात रहिवाशांनाच होणार आहे. येथील पाण्याच्या वाहिन्या जुन्या असून त्या फुटण्याचा धोका होता. म्हणून आम्ही हे काम हाती घेतले होते,’ अशी माहिती साहाय्यक आयुक्त डॉ. संगीता हनसाळे यांनी दिली. यानंतर आणखी पाणी कपात होण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता त्यांनी पाणीकपात ही महापालिकेने ठरवल्याप्रमाणेच होईल. मात्र, त्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही अतिरिक्त पाणी कपातीची घोषणा आमच्या विभागात तरी सध्या नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
लाखोंच्या वस्तीला केवळ तीन टँकर
दोन ठिकाणी पाण्याच्या वाहिनीची दुरुस्ती सुरू असल्याने पाणीपुरवठा खंडित करावा लागला आहे. रहिवाशांना तात्पुरती सोय म्हणून तीन टँकर पाणी पुरविण्यात आले. मात्र तीन टँकर हे येथील लाखो रहिवाशांच्या वस्तीकरिता अपुरे आहेत.