मुंबई : गेले चार दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा वाढला आहे. उन्हाळ्यात ९ टक्क्यापर्यंत खालावलेल्या पाणीसाठ्यात सुधारणा होऊ लागली असून तलावांमधील पाणीसाठा १९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांमध्ये सध्या १९.०८ टक्के पाणीसाठा आहे. जून महिन्यात पाऊस न पडल्यामुळे पाणीसाठा खालावला होता. त्यामुळे मुंबईत सध्या १० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. पुरेसा पाणीसाठा जमा होत नाही तोपर्यंत पाणी कपात कायम राहणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह मुंबई महानगरपालिका प्रशासनाचेही पावसाकडे लक्ष लागले आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने चांगला जोर धरला आहे.

मुंबईला दर दिवशी ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. पावसाळा सरल्यानंतर ऑक्टोबरमध्ये पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात येतो. यावेळी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असतील तर पाणी कपातीची आवश्यकता नसते. सध्या सातही धरणातील पाणीसाठा दोन लाख ७६ हजार दशलक्ष लीटरवर पोहोचला आहे.

तीन वर्षांचा २३ जूनपर्यंतचा जलसाठा (दशलक्ष लिटर मध्ये)
२०२२ — २,७६,१२९
२०२१ — २,६६,८४८
२०२० — २,०४, ५२१