मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक इमारतींवर नोटीस बजावण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबईत एकूण २१६ इमारती अतिधोकादायक स्थितीत उभ्या असून, या इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाळा जवळ आला असून मुंबई महानगरपालिका प्रशासन पावसाळापूर्व कामांत व्यस्त आहे. पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी नुकतीच आढावा बैठक बोलावली होती. त्यावेळी आयुक्तांनी धोकादायक इमारतीबाबत वरील निर्देश दिले.

हेही वाचा – संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना टोला; म्हणाले, “एखादा चांगला घटनातज्ज्ञ असेल तर २४ तासांत…!”

‘सी १’ श्रेणीतील धोकादायक इमारती रिकाम्या करण्याची सूचना आयुक्तांनी यावेळी केली. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांवर घर रिकामे करण्याची नोटीस बजावण्याची, तसेच त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळापूर्व विविध कामे आणि उपाययोजना केल्या जातात. नाल्यांमधून गाळ काढणे, रस्ते दुरुस्तीसोबतच मुंबई महानगरातील निवासी घरांची आणि अनिवासी जागांची तपासणी करून त्यांची धोकादायक आणि अतिधोकादायक श्रेणी निश्चित केली जाते. शहर व उपनगरातील सर्व खाजगी व महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते. अतिधोकादायक बनल्यामुळे तात्काळ पाडून टाकण्याची गरज असलेल्या इमारतींचा ‘सी-१’ श्रेणीत समावेश करण्यात येतो.

पाच वर्षांपूर्वी मुंबईत तब्बल ६१९ अतिधोकादायक इमारती होत्या. त्यानंतर ही संख्या दरवर्षी कमी होऊ लागली आहे. धोकादायक इमारतींपैकी काही इमारती पाडून टाकण्यात आल्या, तर काही इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. यंदा मुंबईतील निवासी व अनिवासी इमारतींचे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. तपासणीअंती मुंबईत ‘सी-१’ श्रेणीतील २१६ इमारती अतिधोकादायक अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा – मुंबई : ‘इन्‍कोव्‍हॅक’ लसीला अल्प प्रतिसाद; २० दिवसांत केवळ ८९ जणांनी घेतली लस

मुंबई महानगरपालिकेच्या धोरणानुसार ३० वर्षे जुन्या इमारतींची संरचनात्मक तपासणी करण्यात येते. संरचनात्मक तपासणीत धोकादायक आढळणाऱ्या इमारतींमधील घरे रिकामी करण्यासाठी ३५४ ची नोटीस बजावण्यात येते.

किती इमारती धोकादायक

मुंबईत एकूण २१६ इमारती अतिधोकादायक स्थितीत उभ्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ११४ इमारती पश्चिम उपनगरातील आहेत. तर शहर भागातील ३६ आणि पूर्व उपनगरातील ६६ इमारतींचा त्यात समावेश आहे. २१६ इमारतींपैकी ११० इमारतींशी संबंधित प्रकरणे न्यायालयात आहेत. तर ९ इमारतींची प्रकरणे तांत्रिक सल्लागार समितीकडे आहेत. त्यामुळे उर्वरित ९७ इमारती पावसाळ्यापूर्वी रिकाम्या करून पाडून टाकण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कुठे किती इमारती

सर्वाधिक धोकादायक इमारती अंधेरी ते वांद्रे परिसरात आहेत.

अंंधेरी, जोगेश्वरी पश्चिम ….. के /पश्चिम विभागात …२२

वांद्रे, खार, सांताक्रूझ पश्चिम …. एच – पश्चिममध्ये …२२

अंंधेरी, जोगेश्वरी पूर्व ….. के – पूर्व …….२१

मुलुंड…टी …२१

घाटकोपर …एन ….१७

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply to dangerous buildings in mumbai will be cut off mumbai print news ssb
First published on: 18-05-2023 at 14:07 IST