मुंबई शहर आणि संपूर्ण महानगर परिसरातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात होणारी अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडे (एनडीआरएफ) अजून सहा तुकड्या पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे. जोरदार होत असलेल्या अतिवृष्टीमुळे लष्कर, नौदल आणि अन्य यंत्रणांच्या संपर्कात राज्य शासन असून त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतिवृष्टीमुळे मुंबई आणि उपनगरांमधल्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला आहे. मदतकार्यासाठी जिल्हा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, पुरात अडकलेल्या खांडवली नजिकच्या नांदखुरी येथील सुमारे ३५ ग्रामस्थांची हेलीकॉप्टरच्या माध्यमातून सुटका करावी अशी विनंती भारतीय हवाई दलाला करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईसोबत ठाणे आणि कोकण किनारपट्टीलाही पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून ठाणे शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या मदत कार्याची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना देखील ठिकठिकाणी सुरू असलेल्या मदत कार्याचे समन्वय करण्याच्या सूचना दिल्या आहेत.आपत्कालिन परिस्थितीवर मुंबई महापालिका आणि आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून देखरेख करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We are ready to face worst disastrous situation will ask ndrf and air force for help says maharashtra cm devendra fadanvis psd
First published on: 04-08-2019 at 13:35 IST