मुंबई : एखाद्या यशानंतर किंवा थोडेसे स्थैर्य आल्यानंतर नकळतपणे येणारी सुप्तावस्था विकासासाठी मारक असते. त्यामुळे भोवतीचे सुखाचे वलय तोडून रोज स्वत:शीच नव्याने स्पर्धा करायला हवी. कालच्यापेक्षा आज आपण अधिक चांगले कसे होऊ याचा विचार सतत हवा आणि त्या जोडीला कठोर मेहनत हवी. त्यानंतर कोणतेही क्षेत्र असो यश आणि त्या यशाचे समाधानही मिळते, असा मूलमंत्र मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी विद्यार्थ्यांना शुक्रवारी दिला. ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या.

दहावीनंतर काय करायचे, कोणती शाखा निवडायची, बदलत्या काळाचा अदमास घेऊन कोणते क्षेत्र निवडायचे, त्यासाठी परीक्षा कोणत्या, अशा विद्यार्थी आणि पालकांना सतावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मदत करणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

चौधरी यांच्यासह गरवारे इन्स्टिटय़ूटचे केयूकुमार नायक, आयटीएम इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ सायन्सचे डॉ. समीर पाचपुते, विद्यालंकार क्लासेसच्या रुचा कुलकर्णी, सारस्वत बँकेचे पवन देशमुख उपस्थित होते. कोणत्याही क्षेत्रात करिअर करताना अपयश येऊ शकते, मात्र त्यानंतर निराश होऊन, कंटाळून प्रयत्न सोडायचे नाहीत. चिकाटीने प्रयत्न करत राहायचे. समोर येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करायचा. प्रशासकीय क्षेत्र हे आव्हानात्मक मात्र तेवढेच आनंद देणारे आहे. येणारा प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवणारा असतो, त्यामुळे सजगतेने प्रत्येक गोष्ट टिपत राहायला हवी, मात्र हे सगळे करताना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यही जपणे गरजेचे आहे. त्यासाठी आहार, सवयी, व्यायाम याबाबत विद्यार्थ्यांनी जागरूक असायलाच हवे, असे चौधरी यांनी सांगितले.

कार्यशाळेच्या शुक्रवारी झालेल्या सत्रात मानसिक स्वास्थ्य कसे जपावे, तणाव कसा टाळावा यावर डॉ. हरीश शेट्टी यांनी पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षांच्या तयारीबाबत डॉ. श्रीराम गीत यांनी मार्गदर्शन केले. समाजमाध्यम क्षेत्रातील करिअर, त्यातील संधी, आव्हाने यांबाबत सारंग साठय़े यांनी, तर सायबर कायद्याबाबत युवराज नरवणकर यांनी मार्गदर्शन केले. जैवतंत्रज्ञान विषयातील संधींची ओळख डॉ. सिद्धिविनायक बर्वे यांनी करून दिली. करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी दहावी, बारावीनंतरच्या अनेक करिअर संधीचे विश्व विद्यार्थ्यांसमोर उलगडले.

मेहनत हवीच..

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणे हे नक्कीच आव्हानात्मक आहे. लाखो उमेदवारांमधून उत्तम कौशल्ये असणारे काहीसे उमेदवारच दरवर्षी पात्र ठरतात. त्यामुळे या परीक्षा हा नशिबाचा खेळ आहे, असे सातत्याने बोलले जाते. मात्र स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची कौशल्ये, क्षमता पणाला लागतात. या परीक्षांमधील यशासाठी मेहनत हा एकमेव घटक आहे. कठोर मेहनत घेऊन तावून सुलाखून निघाल्यावरच यश मिळू शकते, असे चौधरी यांनी सांगितले.

कार्यशाळेत आज काय?

दहावी, बारावी, पदवी अशा वेगवेगळय़ा टप्प्यांवरील करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी, प्रवेश परीक्षांची तयारी, करिअर निवडताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावेत, बदलत्या काळानुसार संधींची क्षेत्र कोणती, अशा अनेक मुद्दय़ांवर मार्गदर्शन करणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही कार्यशाळा आजही होणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (महाराष्ट्र राज्य मानवी आयोग, मुंबई) डॉ़ रवींद्र शिसवे हे शनिवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. त्याचबरोबर करिअर समुपदेशक, विविध विषयांतील तज्ज्ञ या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील. वेगवेगळय़ा क्षेत्रांतील संस्थांची माहितीही येथे मिळू शकेल.

मुख्य प्रायोजक

गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, मुंबई युनिव्हर्सिटी

सहप्रायोजक

विद्यालंकार क्लासेस, आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स, सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

पॉवर्ड बाय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी,  व्हिसिलग वुड्स इंटरनॅशनल, क्लासरूम एज्युटेक, सुविद्या इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी,  आर. ए. सी. यू. एस ग्रुप युनिव्हर्सिटीस फॉर मेडिकल अँड इंजिनिअिरग अ‍ॅडमिशन्स