कधी पावसाच्या सरींनी उतरलेले तापमान, कधी काही क्षणांसाठी गारवा तर कधी थकायला लावत अंगातून घामांच्या धारा काढणारा उकाडा अशा विचित्र वातावरणीय कचाटय़ात मुंबईकर सापडला असून सध्याचे हवामान विषाणूवाढींसाठी पोषक असल्याने साथीचे आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. सध्या सर्दी, खोकला, घसा अतिरिक्त प्रमाणात खवखवण्याचे प्रकार व्यक्तींमध्ये वाढत आहेतच. सोबत डेंग्यूसारखे आजार उद्भवण्याची भीती असल्याने सार्वजनिक आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
मलेरिया, डेंग्यू, एचवनएनवन आणि लेप्टोची साथ यंदाच्या पावसाळ्यात आली होती. मात्र ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात पावसाने निरोप घेतल्यानंतर साथीचे आजारही कमी झाले होते. पण ऑक्टोबरमधील कडाक्याच्या उन्हानंतर पावसाचे शिंतोडे पडत असल्याने तापमानात घट झाली आहे. तापमानात सतत चढउतार होत असले की विषाणूंची वाढ अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसते. विषाणूसंसर्गामुळे साध्या सर्दी- खोकल्यापासून, डासांवाटे पसरणाऱ्या डेंग्यूपर्यंतचे आजार होऊ शकतात. तापमानात चढ-उतार झाले की विषाणूसंसर्गाचा धोका वाढतो. घसा खवखवणे, सर्दी, ताप अशा तक्रारी उद्भवतात. मात्र प्रत्येक वेळी साथीचे आजार पसरतीलच अशी शक्यता नसते. आता डेंग्यू आणि एचवनएनवन हे साथीचे आजार कमी होताना दिसत आहेत. मात्र बदलत्या वातावरणामुळे आजारभय कायम आहे.
पुरेसे जलप्राशन, योग्य आहार आणि आराम या तीन गोष्टी योग्य प्रमाणात ठेवल्या तर रोगप्रतिकारकक्षमता वाढते, बदलत्या वातावरणात या गोष्टींची गरज आहे. लहान मुले आणि वृद्धांची प्रतिकारक क्षमता कमी असते, त्यामुळे त्यांनी या मोसमात काळजी घेतली पाहिजे.
– डॉ. मिनी खेतरपाल, पालिकेच्या संसर्गजन्य आजार प्रतिबंधक विभाग प्रमुख
