महेश काळे, कार्यवाह, लोकमान्य सेवा संघ

नवजात बालकांच्या लसीकरणापासून ते वृद्धाश्रमापर्यंत विविध उपक्रम राबवत आबालवृद्धांना सामावून घेणाऱ्या आणि कला, खेळ, संस्कृती यांनी परिपूर्ण असलेल्या ‘लोकमान्य सेवा संघा’चे येत्या ११ मार्चला शंभराव्या वर्षांत पदार्पण होत आहे. समाजाचे शारीरिक, मानसिक आणि सांस्कृतिक आरोग्य सुदृढ करण्याचा निर्धार बाळगत गेली ९९ वर्षे ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेचा आरंभ आणि वाटचाल याविषयी सांगत आहेत संस्थेचे कार्यवाह महेश काळे..

  • लोकमान्य सेवा संघ ही संस्था कशी अस्तित्त्वात आली ?

लोकमान्य टिळक यांचे निधन झाल्यानंतर १९२३ साली पाल्र्यातील काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लोकमान्य सेवा संघ या संस्थेची स्थापना केली. लोकजागृती व्हावी व लोकहित जपले जावे, असा विचार त्यामागे होता. कार्यकर्त्यांनी स्वबळावर श्रमदान करून संस्थेची वास्तू उभारली. या वास्तूला टिळक मंदिर असे नाव देण्यात आले.

  •   संस्थेतर्फे टिळक मंदिरमध्ये कोणकोणते उपक्रम चालवले जातात?

या वास्तूमध्ये एक ग्रंथालय आहे. त्यात ६० ते ८० हजार ग्रंथ आहेत. स्त्री विभागातर्फे महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध उद्योगांचे, तसेच विविध उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. नागरी दक्षता केंद्रातर्फे अनेक लोकहिताची कामे केली जातात. नागरिकांच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवल्या जातात. युद्धकाळात गस्तही घालण्यात येत होती. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन पाल्र्यात पालिकेची शाळा सुरू केली. संस्थेची व्यायामशाळा आहे. यामार्फत मल्लखांब, जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण माफक दरात आयोजित केले जाते. बालसंगोपन केंद्र म्हणजेच पाळणाघरही चालवले जाते. पाली येथे आनंदधाम नावाचा वृद्धाश्रम सुरू करण्यात आला आहे. केतकर मार्गावर असलेल्या नाडकर्णी बालकल्याण केंद्रातर्फे मूकबधिरांची शाळा चालवली जाते. येथील दिलासा केंद्रातर्फे वृद्धांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाते.

  •   मनोरंजन माध्यमे आणि समाजमाध्यमांचा प्रसार झालेला असताना आताच्या काळात या संस्थेचे स्थान काय आहे?

पूर्वी टिळक मंदिरातील घंटा वाजली की पार्लेकरांना कार्यक्रम सुरू होत असल्याची माहिती मिळत असे. मग हजारो पार्लेकर संस्थेच्या प्रांगणात जमत. अलीकडच्या काळात लोकांचा ओढा कमी झालेला असला तरीही नव्या गोष्टींशी जुळवून घेत लोकांपर्यंत पोहोचत आहोत. समाजमाध्यमांचा वापर केला जातो. संस्थेचे संकेतस्थळही आहे.

  • संस्था चालवण्यासाठी तरुण कार्यकर्ते मिळत आहेत का? 

तरुणांचा म्हणावा तेवढा ओघ संस्थेकडे नाही. बऱ्याचदा निवृत्त झालेल्या व्यक्ती संस्थेत येतात. तरुण कार्यकर्ते मिळाले तर नव्या कल्पना अमलात आणता येतील. म्हणूनच शाखेतर्फे विविध उपक्रम, स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. करिअर मार्गदर्शन केले जाते. नवे तरुण कार्यकर्ते मिळत आहेत. म्हणूनच ही संस्था ९९ वर्षे कार्यरत आहे. पालकांना साहित्याची आवड असेल तर ते मुलांना ग्रंथालयात घेऊन येतात.

  • संस्थेचा वैशिष्टय़पूर्ण उपक्रम कोणता?

टिळक मंदिरमध्ये पु. ल. गौरव दालन आहे. हे दालन पुलंच्या हयातीतच सुरू करण्यात आले होते. पुलंनी स्वत: दिलेले त्यांचे पुरस्कार, प्रशस्तिपत्रके, छायाचित्रे येथे आहेत.

  • संस्था चालवण्यासाठी पाठबळाची गरज भासते का?

शासकीय पाठबळ मिळाले तर हवेच आहे; मात्र सध्या तरी सगळी भिस्त दानशूर व्यक्तींवरच आहे. मूकबधिर शाळेला व ग्रंथालयाला शासकीय अनुदान मिळते.

  • टाळेबंदीचा काळ संस्थेसाठी कसा होता?

टाळेबंदीकाळात आम्ही लोकसहभागातून १० लाख रुपये निधी जमा केला. त्यातून पोलीस आणि गोरगरिबांना शिधावाटप आणि जंतुनाशक वाटप करण्यात आले. तसेच करोनापश्चात निर्माण झालेल्या मानसिक आजारांसाठी विनामूल्य समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले होते. या काळात ऑनलाइन व्याख्यानेही आयोजित करण्यात आली होती.

  • शतकमहोत्सवी वर्षांत कोणते नवे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत?

 सध्या सुरू असलेले उपक्रम अधिक चांगल्या पद्धतीने राबवले जाणार आहेत. आनंदधामचे आधुनिकीकरण आणि गोखले सभागृहाचे नूतनीकरण केले जाणार आहे. ग्रंथालयातील ग्रंथांचे संगणकीकरण केले जाणार आहे. स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कलादालन सुरू केले जाणार आहे. तसेच लोकांना व्यक्त होण्यासाठी मुक्त व्यासपीठ सुरू करण्याचाही विचार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

   मुलाखत: नमिता धुरी