लहान मुलांच्या आरोग्यावर भर देणारे ‘बेबीज कॅसल’ हे देशातील एकमेव ठरणारे ‘वेलनेस सेंटर’ मुंबईत सुरू झाले आहे. ‘बेबीज कॅसल’च्या ‘बेबी अँड मदर वेलनेस सेंटर’चे उद्घाटन नुकतेच अभिनेत्री जेनेलिया डिसूझा हिच्या हस्ते झाले.
या वेळी ही संकल्पना राबविणाऱ्या केंद्राच्या संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रियंका भोईर याही उपस्थित होत्या. आई व बाळासाठी अनुक्रमे गरोदरपण व बाल्यावस्थेतील प्रत्येक क्षण आनंददायी होण्यासाठी तसेच त्या क्षणांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी ‘बेबीज कॅसल’चे हे केंद्र हा मैलाचा दगड ठरणार आहे, असे भोईर यांनी या वेळी स्पष्ट केले.
ऑस्ट्रेलियातील ‘फ्रेंड्स स्वीम अॅकेडमी’ अंतर्गत ‘बेबीज कॅसल’ या केंद्राची नोंदणी करण्यात आली ते भारतातील पहिले आणि एकमेव ‘बेबी अँड मदर वेलनेस सेंटर’ ठरले आहे. ४,१४१ चौरस फूट जागेतील हे केंद्र नवजात बालकांची आकलन क्षमता विकसित करण्यास मदत करते, असा दावा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मातांचे गरोदरपण, त्यानंतरचे बाळंतपण व संपूर्ण पहिले वर्ष सुखकर जगण्यासाठी सहकार्य करेल, असेही सांगण्यात आले.