मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने कचरा व्यवस्थापनासाठी आॅरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर (ओडब्ल्यूसी) यंत्र बसवले असून अन्न आणि स्वयंपाकघरातील कचरा जबाबदारीने व्यवस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला आहे. या यंत्रामुळे स्वयंपाकघरातील आणि बागेतील कचऱ्याला सेंद्रिय खतात रूपांतरित करते.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पर्यावरण पूरक आॅरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर मशीन हे अन्न कचरा कमी करण्यासाठी आणि रेल्वे परिसरात स्वच्छता राहण्यासाठी वापरले जाते. हे यंत्र स्वयंचलित आहे. रेल्वेच्या स्वयंपाकघरातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे कंपोस्ट बायोमास, सेंद्रीय पदार्थात रूपांतर करते. या सेंद्रिय खतांचा वापर रेल्वे परिसरातील बागकामात केला जाणार आहे. या मशीनमध्ये ओला कचरा टाकला जातो. त्याचे यंत्रात तुकडे होतात. बारीक झालेला कचरा एका टाकीत जातो. तेथे कचऱ्याचे विघटन केले जाते. त्यानंतर कचऱ्याचे खत होते.

या यंत्रामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होईल आणि कचऱ्याचे व्यवस्थापन करणे सुलभ होईल. शून्य कचरा मोहीमेला मदत होईल. तसेच प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल. मशीनमुळे तयार होणाऱ्या खताचा वापर बागकामासाठी केला जाणार असल्याने रेल्वे परिसरात हिरवळ पसरेल. त्यामुळे पशुपक्ष्यांची जीवनसाखळी चांगली राहील. तसेच हे आधुनिक कन्व्हर्टर स्वयंचलित असल्याने त्याला कमी मनुष्यबळाची लागते. हे आधुनिक यंत्र भुसा किंवा सूक्ष्मजीवांशिवाय काम करते. तसेच गंध नियंत्रण, दाब सीलबंद प्रक्रिया, शून्य वायू उत्सर्जन यासारखे वैशिष्ट्यांनी हे यंत्र सुसज्ज आहे. ज्यामुळे एक्झॉस्ट किंवा ड्रेनेज सिस्टमची आवश्यकता राहात नाही. हे यंत्र स्वयंपाकघरातील कचरा, बेकरीतील खाद्यपदार्थ, टिश्यू यासह विविध प्रकारचे कचरा हाताळण्यास सक्षम आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.