मुंबई : कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुणांची अट शिथिल करत खुल्या प्रवर्गासाठी ४५ टक्के आणि आरक्षित प्रवर्गासाठी ४० टक्के गुण आवश्यक असल्याचा बदल करण्यात आला आहे. कृषी पदवीच्या संधीपासून इच्छुक विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेतल्याची माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.
कृषी विद्यापीठातील बी. एस्सी. (ऑनर्स) कृषी, उद्यानविद्या, बीएफएससी, वनशास्त्र, बी. टेक. कृषी अभियांत्रिकी, अन्नशास्त्र, जैव तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व सामुदायिक विज्ञान अशा एकूण नऊ पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आतापर्यंत खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी इयत्ता बारावी (विज्ञान) मध्ये ५० टक्के गुणांची अट होती. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची ११८ वी बैठक नुकतीच पार पडली, या बैठकीत सदर अट शिथिल करत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५ टक्के आणि आरक्षित प्रवर्गासाठी ४० टक्के गुणांची अट लागू करण्यात आली आहे. तसेच प्रवेश अर्जासाठी अंतिम मुदत २७ जुलै २०२५ पर्यंत असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
‘सीबीएससी’च्या विद्यार्थ्यांना अधिकचे गुण
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) इयत्ता बारावी (विज्ञान) अभ्यासक्रमात ‘कृषी (८०८)’ हा विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी पदवी प्रवेशात अधिक गुण मिळत नव्हते. आता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या ११५ व्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार या विषयाला १० गुण अधिक देण्यात येणार आहेत. यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात आणण्यासाठी सकारात्मक पाऊल असून, प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, असेही कोकाटे यांनी म्हटले आहे.