१९८० मध्ये मुंबईत प्राध्यापक शांता देवी यांची भर दिवसा लोकल ट्रेनमध्ये हत्या करण्यात आली. या बातमीमुळे सगळी मुंबई आणि महाराष्ट्र हादरुन गेला होता. दोन वर्षे म्हणजे १९८२ पर्यंत या प्रकरणातला खुनी आरोपी सापडत नव्हता. त्यावेळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत काम करणाऱ्या इन्स्पेक्टर मधुकर विनायक झेंडे यांनी कसं पकडलं हे आपण जाणून घेणार आहोत. याबाबत निवृत्त पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांनीच माहिती दिली आहे.

मधुकर झेंडे यांनी काय सांगितलं?

शांता देवी या प्राध्यापिका होत्या आणि त्या पार्ले येथील महाविद्यालयात शिकवायच्या. लोकल ट्रेनने त्या महाविद्यालयात जात होत्या. त्यावेळी एका दरोडेखोराने त्यांच्या गळ्यात असलेली सोन्याची साखळी खेचण्याचा प्रयत्न केला. शांता देवी यांनी त्याला प्रतिकार केला. त्यामुळे रागातून त्या दरोडेखोराने शांता देवी यांच्यावर धारदार चाकूचे २५ ते ३० वार केले. शांता देवी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्या दरोडेखोराचे कपडेही रक्ताने भिजले. त्या दरोडेखोराने लोकलची चेन खेचली आणि तो उडी मारुन पळून गेला. मात्र पळताना त्याची पँट, चप्पल सगळं रक्ताने भरलं होतं. त्यामुळे त्याने ती पँट आणि चप्पल तिथेच फेकली आणि पार्ले स्टेशनच्या आधी झोपडपट्टीत मित्राकडे गेला. मित्राला सांगितलं मला लुंगी दे. ही लुंगी नेसून तो पळाला. त्यावेळी या घटनेने खळबळ उडाली होती. कारण मुंबईत सकाळी ११ वाजता एका महिला प्राध्यापिकेची हत्या झाल्याची ती घटना होती. आरोपी फरार झाला. पण दोन वर्षे सापडत नव्हता अशी माहिती निवृत्त पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांनी लगाव बत्तीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली. हा आरोपी पकडला कसा गेला याबाबतही त्यांनी पुढे माहिती दिली.

शांता देवी यांचे पतीही प्राध्यापक होते-झेंडे

मधुकर झेंडे पुढे म्हणाले, “शांता देवी यांचे पती प्राध्यापक नारायण होते. नारायण सामाजिक कार्यात सक्रीय होते. त्यावेळी त्यांनी बी. आर. अंतुले यांची भेट घेतली. ज्यानंतर अंतुले यांनी सांगितलं की या प्रकरणाचा छडा लावा. रिबेरो सर तेव्हा सह पोलीस आयुक्त होते. त्यांनी दोन वर्षे आरोपीचा शोध घेतला. पण त्याचा शोध काही लागेना. सरकारने तेव्हा आरोपीला पकडून द्या १० हजार रुपये बक्षीस मिळेल अशीही घोषणा केली.

१९८२ मध्ये नेमकं काय घडलं होतं?

१९८२ मध्ये माझी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत बदली झाली. त्यावेळी आमच्या पोलिसांनी एका चोराला पकडलं होतं. तो झोपलेल्या माणसांची घड्याळं चोरायचा. त्याच्याकडून आम्ही १५ ते २० घड्याळं जप्त केली. त्यावेळी त्याने मला सांगितलं तुम्ही जी घड्याळं घेतलीत ती चोरीची आहेत. पण हे जे एचएमटीचं घड्याळ आहे ते मला माझ्या बायकोने लग्नात दिलं आहे हे चोरीचं नाही. मी त्याच्यावर थोडा विश्वास ठेवला. त्या आरोपीला कोर्टात पाठवताना तेवढं घड्याळ मी बाजूला काढून ठेवलं. त्या घड्याळ चोराला कोर्टाने सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

घड्याळ चोराने मला टीप दिली आणि…

शिक्षा संपल्यानंतर तो मला भेटायला आला. मला म्हणाला मी आता चोरी करणार नाही. तेव्हा मी त्याला त्याचं एचएमटीचं घड्याळ दिलं. त्याला म्हटलं तुझ्या बायकोने तुला हे घड्याळ दिलंय त्यामुळे मी ते ठेवलं. त्याने माझे आभार मानले, त्यानंतर चार पाच दिवसांनी तो मला पुन्हा भेटायला आला. मला म्हणाला शांता देवी यांची हत्या झाली होती ना त्यांचा खून कुणी केला मला माहीत आहे. तो अंतर्वस्त्र घालूनच माझ्याकडे आला होता. मी त्याला लुंगी दिली. आता तो इथून पळाला आहे. तो सध्या जळगावच्या जवळ शेंदुर्णी गाव आहे तिथे काम करतो. त्याला हे सांगू नका की मी त्याची खबर दिली. त्यानंतर आम्ही स्टाफ तिथे पाठवला. त्या आरोपीला पकडून आणलं. त्यावेळी त्याला पँट घालायला दिली. पण ती त्याला घट्ट झाली. कारण दोन वर्षांत तो जाड झाला होता. मग चप्पलही त्याला घालायला दिली. तर चप्पल बरोबर आली. मी त्याला म्हटलं बघ चप्पल तुला आली आहे बरोबर. तर तो मला म्हणाला मुंबईतल्या अर्ध्या लोकांच्या पायाचा नंबर आठ आहे मला सोडून द्या या प्रकरणात अडकवू नका. त्यानंतर विक्रोळीच्या झोपडपट्टीत तो राहात होता तिथल्या चांभारांना बोलवलं कारण ती चप्पल शिवलेली होती. ते सात ते आठ लोक आले. शिंदे नावाचा एक माणूस त्यांच्यात होता. तो म्हणाला ही शेठ माणसाची चप्पल आहे. मला ईदच्या वेळी चप्पल पॉलिश केली त्याचे २५ रुपये दिले होते. मी त्याला ओळखतो. मग त्या आरोपीला म्हणजेच कय्युमला आम्ही त्या शिंदे समोर आणलं. त्यानंतर आरोपीने गुन्हा कबूल केला. रिबेरो तेव्हा पोलीस आयुक्त झाले होते. मी त्यांच्या समोर त्या कय्युमला हजर केलं. आम्हाला त्याच्यावर असलेलं १० हजार रुपयांचं बक्षीस मिळालं. मी एका गुन्हेगाराशी माणुसकीने वागलो त्याने मला खबर दिली आणि शांता देवी हत्या प्रकरणाचा छडा लागला.” असं मधुकर झेंडे यांनी सांगितलं.