मुंबई: महाराष्ट्र विधानसभेत गुरूवारी रात्री झालेल्या दोन पक्षातील गटांच्या हाणामारीच्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गटातील कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वातावरण आणखी चिघळलं आहे. नितीन देशमुख यांच्या अटकेमुळे जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले. सुरूवातीला शिवीगाळ झाल्यानंतर वादाचं रूपांतर थेट हाणामारीत झालं. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाली. पोलिसांनी नितीन देशमुख यांना अटक केल्यानंतर रात्रीदेखील हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
कोण आहेत नितीन देशमुख?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )गटाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून नितीन देशमुख ओळखले जातात. गेल्या १५ वर्षांपासून ते पक्षात सक्रिय आहेत. मुंबईतील घाटकोपर विधानसभा मतदारसंघात ते राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करतात. देशमुख हे जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. घाटकोपरमधील स्थानिक राजकारणातही नितीन देशमुख यांचा प्रभाव आहे.
नितीन देशमुख यांच्या अटकेच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र आंदोलन केलं. कार्यकर्त्यांसह पोलिसांच्या गाडीसमोर आंदोलन झाले आणि पोलीस ठाण्यात जाऊन देशमुख यांच्या सुटकेची मागणी केली. आव्हाड यांनी आरोप केला की, मारहाण करणाऱ्यांवर कारवाई न करता पोलिसांनी पीडित व्यक्तीला अटक केली आहे. हा अन्याय आहे आणि याविरोधात आम्ही लढा देऊ.”
या घटनेनंतर पोलिसांच्या कारवाईवरदेखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत तसंच या प्रकरणात पोलिसांनी पक्षपात केल्याचा आरोपही आव्हाडांनी केला. एकंदर या घटनेमुळे विधानसभेतील राजकीय तणाव वाढला असून आजच्या शेवटच्या दिवशी याचे तीव्र पडसाद विधीमंडळात उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधीमंडळ परिसरातील हाणामारीच्या घटनेचं सीसीटीव्ही छायाचित्रण तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याचा अहवाल आल्यावर हाणामारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.