सासवड येथे जानेवारी महिन्यात होणाऱ्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल १६ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच ही निवडणूक कोणतेही आरोप-प्रत्यारोप न होता आणि कोणत्याही प्रकारची विशेष वातावरणनिर्मिती न होता शांततेत पार पडली. निवडणुकीसाठी मतदारांमध्येही फारसा उत्साह दिसला नाही. बुधवारी जाहीर होणाऱ्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर निवडणुकीतील चारही उमेदवारांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केलेले हे मनोगत..
विवेकी आणि सुजाण मतदारांचा कौल-प्रभा गणोरकर
संमेलनाध्यक्षपदाची ही निवडणूक अन्य निवडणुकींपेक्षा वेगळी असते. जाणकार वाचक आणि मतदार यांच्याशी केलेला संवाद व संपर्क यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून असतो. त्यामुळे हा निकाल म्हणजे विवेकी, शहाण्या आणि सुजाण मतदारांचा कौल असेल. मतदारांचा कौल मलाच मिळेल, असा विश्वास मला वाटतो. या वेळच्या निवडणुकीचे खास वैशिष्टय़ म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आणि प्रचार कमालीच्या समंजसपणे पार पडला. निवडणुकीचा निकाल काय लागतो, त्याबाबत मलाही खूप उत्सुकता आहे.
मी आशावादी आहे- फ. मु. शिंदे
ही निवडणूक आहे, त्यामुळे सुजाण मतदारांनी काय कौल दिला असेल हे सांगणे कठीण आहे. नव्हे ते सांगता येणार नाही. पण निवडणूक निकालाबाबत मी आशावादी आहे.
सांस्कृतिक चळवळ व्हावी -सोनवणी
निवडणुकीत मला विजय मिळो अथवा न मिळो. जे काम हाती घेतले आहे, ते पूर्ण करायचे हा माझा निर्धार आहे. या वेळची निवडणूक ही पहिल्यांदा सामाजिक निवडणूक झाली. साहित्य संमेलन हे सामाजिक- सांस्कृतिक चळवळ झाले पाहिजे, त्यासाठी मी यापुढेही प्रयत्न करणार आहे.
एकमेकांवर टीका झाली नाही -गोडबोले    
यंदाच्या संमेलनाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे खास वैशिष्टय़ म्हणजे निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी कोणीही एकमेकांवर वैयक्तिक स्वरूपाची टीका
केली नाही किंवा प्रचाराची हीन पातळीही गाठली नाही. संमेलनाध्यक्षपद हे निवडणूक लढवून नव्हे तरसन्मानाने मिळावे, असे मला वाटते. निवडून आलो तर निवडणूक न होता, ज्येष्ठ साहित्यिकाला हे पद सन्मानाने कसे मिळेल, त्यासाठी पाठपुरावा करेन.