Ranveer Allahbadia: युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने कॉमेडियन समय रैनाच्या इंडियाज गॉल लेटेंट या युट्यूब शोमध्ये आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानानंतर अनेकांनी संताप व्यक्त करत टीका केली. यानंतर महाराष्ट्र सायबर विभाग आणि मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली. रणवीर अलाहाबादियाने नुकतीच महाराष्ट्र सायबर विभागासमोर हजेरी लावून चौकशीत सहकार्य केले. यावेळी त्याने पालकांच्या खासगी क्षणाबाबत केलेल्या विधानाबद्दल आपली चूक मान्य केली.

सोमवारी रणवीर अलाहाबादिया आणि युट्यूबर आशिष चंचलानी यांनी त्यांचा जबाब नोंदविला होता. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये अभद्र भाषेचा वापर केल्याबद्दल रणवीरने पश्चाताप व्यक्त केला. तसेच केवळ समय रैनाच्या मैत्रीखातर या शोमध्ये उपस्थिती लावली होती, असे सांगितले. या उपस्थितीसाठी कोणतेही पैसे घेतले नसल्याचेही रणवीरने सांगितले.

नवी मुंबई येथील सायबर विभागाच्या मुख्यालयात रणवीर अलाहाबादिया चौकशीसाठी हजर झाला होता. समय रैनाशी मैत्री असल्यामुळे ते एकमेकांना मदत करत असल्याचे त्याने सांगितले.

रणवीर अलाहाबादिया हा त्याच्या ‘बिअरबायसेप’ या युट्यूब चॅनेलसाठी ओळखला जातो. त्याच्या पॉडकास्टचे अनेक व्हिडीओ प्रसिद्ध झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना रणवीरने द इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये नको ते विधान केले होते. यानंतर त्याच्यासह शोमध्ये उपस्थित असलेल्या आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग, अपूर्वा मुखिजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाद उद्भवल्यानंतर रणवीर अलाहाबादियाने व्हिडीओ जाहीर करून माफी मागितली होती. “माझे विधान आक्षेपार्ह होते. त्यात काही विनोदही नव्हता. विनोदनिर्मिती ही माझी शैली नाही. मी त्याबद्दल माफी मागतो”, असे रणवीरने सांगितले होते. मागच्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाच्या अटकेला अंतरिम स्थगिती दिली होती. मात्र त्याचे विधान अभद्र असल्याचेही सांगितले. त्यासोबतच त्याचे विचार घाणेरडे असून समाजाला लाज आणणारे आहेत, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले.