मुंबई : वादग्रस्त वक्तव्ये आणि सभागृहात भ्रमणध्वनीवर रमी खेळत असल्याची चित्रफीत प्रसारीत झाल्यामुळे अडचणीत आलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनासाठी कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटना सरसावल्या आहेत.
शेतकरी पीक विम्याच्या पैशातून साखरपुडा, लग्न करतात. पीकविम्यातून आलेल्या पैशांची शेती गुंतवणूक होत नाही. भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा देतो आणि शेतीत पिकेच नाहीत तर काय, ढेकळाचे पंचनामे करायचे आहेत का, या वादग्रस्त वक्तव्यानंतर विधान परिषदेचे कामकाज सुरू असतानाही भ्रमणध्वनीवर रमी खेळत असतानाची चित्रफीत प्रसारीत झाल्यामुळे कोकाटे यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. सर्व स्तरातून राजीनाम्याची मागणी होऊ लागली असतानाच विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मात्र त्यांच्या समर्थनासाठी धावले आहेत.
महाराष्ट्र राज्य कृषी अधिकारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्यातील शेती, शेतकरी आणि कृषी विभागासाठी कोकाटे यांनी सतत धाडसी, दूरगामी निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जावून प्रत्यक्ष पहाणी करणे. कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्रांना भेटी देणे. विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधणे, असे उल्लेखनीय काम केले आहे. अल्पावधीत ५२ शासन निर्णय प्रसिद्ध करून विभागाच्या कामाला गती दिली आहे. बदल्या आणि अधिकारांचे विकेंद्रीकरण केले. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचा दूरगामी हिताचा निर्णय कोकाटे यांनी घेतला आहे. या सर्व घटना, घडामोडी, कामांचे आणि निर्णयांचे आम्ही साक्षीदार आहोत. आपल्या नेतृत्वावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आपणास आमचा सक्रिय पाठिंबा आणि समर्थन राहील, असेही कृषी अधिकारी संघटनेने म्हटले आहे.
कृषी कर्मचाऱ्यांना सन्मान दिला
कृषी सहाय्यक संवर्गाची गेल्या बारा वर्षांपासून पदनाम बदलाची मागणी आपण मार्गी लावून कृषी सहाय्यक पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी, असे केले. त्यामुळे कृषी कर्मचाऱ्यांचा सन्मान वाढला. शेतकऱ्यांना कृषी सेवा जलद गतीने मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतला. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, अॅग्रीस्टॅक, कृषी समृद्धी योजना, साथी पोर्टल, कृषी विभागात सुधारणा करण्यासाठी सारंगी समितीची स्थापना, असे अनेक दूरगामी परिणाम करणारे निर्णय आपण घेतले आहेत. त्यामुळे अडचणीच्या काळात राज्यभरातील सहाय्यक कृषी अधिकारी आपल्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, असे महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेने म्हटले आहे.