दत्तकधारकांकडून कराराचे नूतनीकरण नाही; आदित्य ठाकरे यांचाही त्यात समावेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरकारची वन्यप्राणी दत्तक योजना प्राणिप्रेमींकडून उपेक्षितच राहिली आहे. योजनेला सुरुवात झाल्यापासून तीन वर्षांच्या कालावधीत केवळ १५ जणांनी योजनेअंतर्गत प्राणी दत्तक घेतले आहेत, तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व त्यांचे बंधू तेजस ठाकरे यांच्यासह अन्य काही जणांनी प्राणी दत्तक कराराचे नूतनीकरण केलेले नाही. यामुळे ही योजना बासनात गुंडाळण्याची वेळ आली आहे.

ही योजना सुरू झाल्यावर २०१४ मध्ये आदित्य यांनी ‘यश’ नावाचा वाघ, तर तेजस याने वाघटी दत्तक घेतले होते. तसेच काही दिवसांपूर्वी रामदास आठवले यांनी बिबटय़ाला दत्तक घेतले आहे. २०१४ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे  वन्यजीव दत्तक योजनेला सुरुवात करण्यात आली होती. याच योजनेतंर्गत अनेकांनी वन्यप्राण्यांना दत्तक घेतले. योजनेच्या प्रारंभी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी या दत्तक योजनेत सहभाग घेतला होता. मात्र चार वर्षांत दत्तक घेणाऱ्यांची संख्या लक्षात घेता हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने योजनेला मरगळ आल्याचे उद्यानातील अधिकाऱ्याने सांगितले.

२०१४ पासून आजतागायत केवळ १५ जणांनी योजनेंतर्गत १८ वन्यप्राण्यांना दत्तक घेतले आहे. यामध्ये सिंह, वाघ, बिबटय़ा, भेकर, वाघटी, चितळ या प्राण्यांचा समावेश असून २०१४ मध्ये १०, २०१५ मध्ये चार, २०१६ मध्ये दोन, तर २०१७ मध्ये (मे महिन्यापर्यंत) दोन वन्यप्राण्यांना दत्तक घेतले गेले आहे. यामधील नीलगाय मात्र अजूनही पालकाच्या शोधात आहे. सध्या उद्यानात एकूण ९६ वन्यप्राणी दत्तक  योजनेंतर्गत दत्तक  घेण्यासाठी उपलब्ध आहेत. दत्तकधारकाने दिलेले दत्तकमूल्य हे त्या प्राण्याच्या खाण्यासाठी तसेच वैद्यकीय तपासणीसाठी खर्च केले जात असल्याची माहिती उद्यानातील अधिकाऱ्याने दिली. मात्र दत्तक घेतलेल्यांनी या प्राण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.

प्राणी दत्तक करार एका वर्षांत संपुष्टात आल्यानंतर दत्तकधारकांनी त्याचे नूतनीकरण केले नसल्याचे निदर्शनास येते. आदित्य ठाकरे यांनी ३,१०,००० दत्तक शुल्क देत वाघ, तर तेजस यांनी १,००,००० देत दोन वाघटी दत्तक घेतली होती. दोघांनीही मे २०१४ मध्ये केलेला दत्तक करार २०१५ मध्ये संपुष्टात आला, त्यानंतर त्याचे नूतनीकरण करून तो २०१६ पर्यत वाढवण्यात आला. मात्र जुलै २०१६ मध्ये करार संपुष्टात आल्यानंतर त्याचे पुन्हा नूतनीकरण झाले नाही. कराराचे नूतनीकरण करावे का, हा दत्तकधारकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे नूतनीकरणासंदर्भात पत्रव्यवहार केला जात नसल्याचे उद्यानातील वनाधिकारी देवरे यांनी सांगितले. यासंबंधी आदित्य ठाकरे प्रतिक्रिया देण्यास उपलब्ध होऊ शकले नाहीत, त्याऐवजी  त्यांच्या सहकाऱ्याने आदित्य यांना वन्यजीवांबाबत आवड असल्याने योजनेच्या प्रारंभी त्यांनी प्राणी दत्तक करार केला होता, असे सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wild animal adoption scheme issue in borivali national park
First published on: 19-05-2017 at 02:31 IST