मुंबई : मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाची िहमत नाही.  तसा कोणी विचारही करू शकत नाही. आम्हाला मुंबई महाराष्ट्रापासून नव्हे, तर शिवसेनेच्या भ्रष्टाचारापासून वेगळी करून महाराष्ट्राला भूषण वाटेल अशी मुंबई तयार करायची आह़े  त्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत लंका दहन होणार, मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार, असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारचा ढाचा पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपतर्फे हिंदी भाषी महासंकल्प सभा गोरेगावातील नेस्को मैदानावर रविवारी पाड पडली. त्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या शनिवारच्या भाषणाला प्रत्युत्तर म्हणून या सभेबद्दल उत्सुकता होती. फडणवीस यांनी आपल्या भाषणात ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या आरोपांना उत्तर दिले. सामूहिक हनुमान चालिसा पठण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच प्रत्येकाच्या खांद्यावर उत्तर भारतीय गमछा होता. आपल्या भाषणाची सुरुवात भोजपुरी भाषेतून करत फडणवीस व आशिष शेलार यांनी उत्तर भारतीयांच्या भावनेला हात घातला. ‘बिन पैसा होत न आज्ञा’ या हनुमान चालिसामधील उक्तीनुसार ठाकरे सरकारचा कारभार सुरू असल्याचा टोलाही फडणवीस यांनी लगावला. 

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. तो फेटाळून लावताना फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केल़े  शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबईची किती वाट लागली, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आमच्या सरकारच्या काळात मुंबईच्या विकासासाठी सुरू केलेल्या सर्व योजना व प्रकल्प ठाकरे सरकारच्या काळात ठप्प झाले आहेत. परिणामी मुंबईकरांना त्याचे परिणाम भोगावे लागत असल्याची टीका फडणवीस यांनी केली. 

अयोध्येला गेलो तेव्हा मी नगरसेवक आणि वकील होतो, असे सांगत गोळय़ा-लाठय़ांची पर्वा न करता अयोध्या आंदोलनात गेलो होतो. बाबरी पाडायला गेलो होतो. तुम्हाला मिर्ची का लागली, असा सवाल फडणवीस यांनी एका गाण्याचे बोल वापरत केला. मी जमिनीशी-सामान्य लोकांशी जोडलेला कार्यकर्ता आहे म्हणून या स्थानापर्यंत आलो. तुमच्यासारखा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलो नाही. माझ्या पाठीत खंजीर खूपसून माझे राजकीय महत्त्व कमी कराल, हे विसरून जा. तुमच्या सत्तेचा ढाचा पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा दिला.

फडणवीस म्हणाले..

* वाघाचे छायाचित्र काढून वाघ होता येत नाही. त्यासाठी निधडय़ा छातीने लढावे लागते. उद्धव ठाकरे यांनी आजवर कोणता संघर्ष केला? * आता देशात एकच वाघ आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी़ तुम्ही आम्हाला लाथ मारली म्हणता पण लाथा तर गाढव मारत़े