मुंबई : तांत्रिक अडचणींमुळे बंद असलेल्या चिपी विमानतळाची सेवा पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विमानतळावरील सेवा पूर्ववत करण्यास मान्यता मिळाली आहे. गणेशोत्सवापूर्वी विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्नशील असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.
सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाची सेवा काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे बंद आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करून हे विमानतळ व्हायबलिटी गॅप फंडिंग (व्हीजीएफ) अंतर्गत सुरू करण्यासाठी केंद्राची परवानगी घेतली आहे. त्यानुसार मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चिपी विमानतळाची सेवा पूर्ववत करण्यास सकारात्मक निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.
चिपी विमानतळाची सेवा पूर्ववत झाल्यास कोकणातील, राज्यातील व राज्याबाहेरील पर्यटकांना याचा मोठा फायदा होईल. तसेच व्हीजीएफमुळे चिपी विमानतळाची नाइट लँडिंगची समस्या देखील दूर होईल. त्यामुळे चिपी विमानतळाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल. गणेशोत्सवापूर्वी ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ही मंत्री राणेंनी सांगितले.
वेंगुर्ला – कॅम्प गवळीवाडा येथील अतिक्रमणे नियमित
वेंगुर्ला गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील वर्षांनुवर्षे असलेली अतिक्रमण नियमानुकूल करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. वेंगुर्ला गवळीवाड्यासाठी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न लावून धरला होता. त्यामुळे हा विषय मार्गी लागला आहे. याचे संपूर्ण श्रेय केसरकर यांना जाते, असेही मंत्री राणे म्हणाले.