मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या टाळीच्या प्रस्तावाची तेव्हा खिल्ली उडविणाऱ्या राज ठाकरे यांनी ‘आमच्यातील वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचे सांगत युतीच्या संकेताला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगेचच सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी ठाकरे बंधूंमधील राजकीय इर्षा तसेच एकूण राजकारण लक्षात घेता हे दोघे एकत्र येण्याबाबत साशंकताच व्यक्त केली जाते. राज ठाकरे यांची ही खेळी म्हणजे भाजपच्या राजकारणाचा डाव असल्याचा संशय ठाकरे गटाकडून व्यक्त केला जात आहे. शिवसेनेतून बाहेर पडून उद्धव ठाकरे यांना आव्हान देणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चारच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन केले होते. यानंतर लगेचच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर हातमिळवणी करण्याचै संकेत दिले आहेत. राज ठाकरे यांच्या या खेळीमागे काहीतरी वेगळा डाव असल्याचा संशय यामुळेच ठाकरे गटाच्या नेत्यांना आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत महायुतीने बरोबर घेतले नाही. त्यातच राज ठाकरे यांच्या मुलाचा दादर-माहीम मतदारसंघात पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी भूमिका घेत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सूड उगविला होता. विधानसभा निवडणुकीत मनसेचा पार धुव्वा उडाला. पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. कधी भाजपला पाठिंबा, कधी विरोध अशा धरसोड वृत्तीमुळे पक्षाला मोठा फटकाही बसला आहे. अशा वेळी राज ठाकरे यांनी युतीचा हात पुढे केला म्हणून उद्धव ठाकरे लगेचच बरोबर जाण्याची अजिबात शक्यता नाही. राज ठाकरे वा उद्धव ठाकरे बंधूपैकी एक पाऊल मागे घेण्याची कोणाची तयारी नसल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. युतीसाठी दोघांनाही समझोता करावा लागेल. त्यासाठी दोघांची तयारी आहे का, हा खरा प्रश्न. आताच्या घडीला उद्धव ठाकरे मागे जाणार नाहीत हे तरी जाणवते. यामुळेच राज ठाकरे यांनी युतीचा प्रस्ताव दिला असला तरी चार दिवस तो चर्चेत राहिल पण एकत्र येण्याची शक्यता धूसरच दिसते.

राजकीय ताकद वाढविण्याचा प्रयत्न

● मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी २०१७ मध्ये उद्धव ठाकरे यांनी टाळीचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा राज ठाकरे यांनी या प्रस्तावाची खिल्ली उडविली होती.

● महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी शेवटच्या क्षणी मनसे नेते बाळा नांदगावकर हे ‘मातोश्री’वर गेले होते. पण अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्याशीच चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारली होती.

● मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाची ताकद कमी करण्यासाठी भाजपकडून शिंदे गट आणि मनसेचा वापर करून घेतला जातो. विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वत्र महायुतीने बाजी मारली असली तरी मुंबईत ठाकरे गटाचे १० आमदार निवडून आले आहेत. ठाकरे गटाची मुंबईतील ताकद अद्यापही कायम असल्याचे त्यातून स्पष्ट झाले होते. यामुळेच ठाकरे गटाचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपकडून कधी मनसेला ताकद दिली जाते.

● मध्यंतरी मराठीच्या वापरावरून राज ठाकरे यांनी बँका व सरकारी कार्यालयांना इशारा देताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी केली होती. मराठीवरून मनसेला अधिक बळ मिळावे, असाच एकूण प्रयत्न होता.

● मनसेच्या मर्यादा विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाल्या. आपली राजकीय ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात राज ठाकरे आहेत. राजकीयदृष्ट्या फारशी ताकद नसलेल्या राज ठाकरे यांच्याबरोबर जाण्याची घाई उद्धव ठाकरे करणार नाहीत हे सुद्धा तितकेच स्पष्ट आहे.

● राज ठाकरे यांनी मैत्रीचा हात पुढे केल्याने त्याला प्रतिसाद दिला नाही तर पुन्ही टीका होणार हे गृहित धरून उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पण त्यासाठी अट घातली. भाजपबरोबर जाणार नाही ही शिवरायांसमोर शपथ घ्या, अशी भूमिका मांडली.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे की नाही यावे, हे आम्ही दुसऱ्या कोणत्या राजकीय पक्षाने सांगण्याचे काही कारण नाही. प्रत्येकाने योग्य वाटते तो निर्णय घ्यावा.

अजित पवार, उपमुख्यमंत्री

उद्धव ठाकरे यांना स्वत:च्या संघटनेत इतरांनी येणे उचित वाटत नाही. शरद पवारांशी त्यांचे जमले नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्याशी तर जमणारच नाही.

संजय शिरसाट, प्रवक्ते, शिवसेना शिंदे गट

राज ठाकरे हे प्रत्येक वेळी नवे विषय काढून समस्या निर्माण करत आहेत, लोकांमध्ये गैरसमज वाढवत आहेत. मुंबईचे अर्थकारणच त्यांच्यामुळे बिघडत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार राज ठाकरेंच्या भेटीसाठी जाऊ नये.

रामदास आठवले , समाज कल्याण राज्यमंत्री

आम्ही भारत जोडोवाले आहोत, कुटुंब फोडणारे नाहीत. दोन परिवार एकत्र येत असतील तर आक्षेप घेण्याची गरज नाही, जोडले जात असतील तर स्वागतच आहे.

-हर्षवर्धन सपकाळ , प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका ठरवावी. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांनी देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. पण विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजप किंवा महायुतीसोबत राहण्यास नापसंती दर्शवली. आता कोणता निर्णय घ्यायचा, हा राज ठाकरे यांचा अधिकार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री