राज्यात भाजप-शिवसेना सत्तेवर आल्यानंतरच्या सात-आठ महिन्यांमध्ये कर्जबाजारी व नापिकीमुळे १८०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, आता कुणावर ३०२चा खुनाचा गुन्हा दाखल करायचा, असा सवाल करीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी सरकारवर टीकास्त्र सोडले. गेल्या तीन-चार वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते माणिकराव ठाकरे यांनी केली.
मुंडे यांनी, युती सरकारवर शरसंधान साधण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षात असताना भाजपने आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करून सरकारवर ३०२चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, त्याचा संदर्भ धनंजय मुंडे यांनी दिला. भाजपच्या शोभाताई फडणवीस यांनी आघाडी सरकारच्या काळात कर्जमाफीचा फक्त पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झाल्याचे सांगितले. या प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्री उद्या उत्तर देणार आहेत.
‘कर्मचाऱ्यांची कपात करा’
शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील चर्चेत भाग घेताना सरकारी कर्मचाऱ्यांच्या कपातीची सूचना करून एका नव्या वादाला तोंड फोडले. एक रुपयातील ८२ पैसे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होतात, हा कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध बदलला पाहिजे. शिपाई, वाहनचालक ही पदे कशाला पाहिजेत, असा सवाल करीत त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या कपातीची सूचना मांडली. सहावा वेतन आयोग झाला, आता सातवा वेतन आयोग देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. सरकारी कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध बदलला तर, २५ हजार कोटी रुपये वाचतील, असा दावा त्यांनी केला.
————–
———–