वरिष्ठांचे आदेश नसतील तर चकमकी करण्यास पोलीस निरीक्षक किंवा शिपाई धजावतील का, असा सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बनावट चकमकींच्या वादाला नवे वळण दिले.
रामनारायण गुप्ता उर्फ लखनभैय्या बनावट चकमकप्रकरणी न्यायालयाने वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रदीप सूर्यवंशी यांच्यासह १३ पोलीस व सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. पण लखनभैया हा साधुसंत नव्हे, तर गुंडच होता, मग त्याला चकमकीत मारणाऱ्या या मराठी पोलीसांच्या पाठीशी राज्य सरकार का उभे राहात नाही, असा सवालही त्यांनी केला. अशा चकमकी वरिष्ठांच्या आदेशांशिवाय होतात का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात पोलिसांचे खच्चीकरण होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. शिक्षा झालेल्या पोलिसांना कायदेशीर साह्य़ करण्याचे शिवसेनेने अगोदरच जाहीर केले आहे. मनसेनेही आता यात उडी घेतल्याने सेना-मनसे यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा आहे.
लखनभैय्या चकमकप्रकरणी केवळ मराठी पोलीसच दोषी ठरले, अमराठी पोलीस नामानिराळे राहिले, असे ते म्हणाले. पोलीस अधिकारी प्रदीप सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. सरकारने पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आधार दिला पाहिजे. मात्र त्याऐवजी सरकार त्यांचे नीतीधैर्य खच्ची करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारला डान्सबार
बंदीची इच्छाच नाही
डान्सबार बंद व्हावेत, असे सरकारला वाटतच नसल्याची टीका राज यांनी यावेळी केली. न्यायालयात बाजू मांडण्यासाठी चांगले वकील नियुक्त केले गेले नाहीत, असे त्यांनी सांगितले. तेलगी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगी हा डान्सबारमुळेच पकडला गेल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.