विशेष पीएमएलए न्यायालयाने महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्याविरुद्ध मनी लॉन्डिरग प्रकरणात गंभीर टिप्पणी केली आहे. साक्षीदारांच्या जबाबात महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांचा मनी लॉन्डिरगमध्ये सहभाग असल्याचे दिसून येते असे न्यायालयाने म्हटले आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ‘ईडी’ कोठडीनंतर आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आरएन रोकडे यांच्यासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली होती. या आदेशाची प्रत मंगळवारी उपलब्ध झाली. अंमलबजावणी संचालनालय या प्रकरणाची चौकशी करत आहे.

नवाब मलिकयांना ईडीने २३ फेब्रुवारीला अटक केली होती. तपास यंत्रणेने पुढील कोठडी न मागितल्याने सोमवारी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ईडीने मलिकांच्या पुढील कोठडीची मागणी केली नसली तरी आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते.

तपासाच्या प्रगतीदरम्यान साक्षीदारांचे जबाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. न्यायालयासमोर ठेवलेल्या साहित्याच्या आधारे आरोपीला ७ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली.  साक्षीदारांच्या जबाबावरून प्रथमदर्शनी आरोपींचा मनी लॉन्डिरग मध्ये सहभाग दिसून येतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाने सांगितले की, “मनी लॉन्डिरग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे गुन्ह्यातील रकमेची अद्याप माहिती मिळालेली नाही आणि तपास अद्याप प्राथमिक टप्प्यावर आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आरोपीने कोठडीच्या आधीच्या आदेशांना तसेच त्याच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कोठडी अहवालात नमूद केलेले कारण लक्षात घेता आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करणे आवश्यक आहे.”

दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांना अद्याप दिलासा मिळू शकलेला नाही. यापूर्वी १३ दिवसांची ईडीच्या कोठडीनंतर आता त्यांना मुंबईच्या पीएमएलए कोर्टानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळं मलिकांची रवानगी आता ऑर्थर रोड तुरुंगात झाली आहे