मुंबई : दहिसर येथील एस. व्ही रोडजवळील न्यू जनकल्याण सोसायटीत रविवारी दुपारी तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत १९ जण जखमी झाले असून त्यातील एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला. तसेच, अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

शांतीनगरातील २३ मजली न्यू जनकल्याण सोसायटीच्या सातव्या मजल्यावर रविवारी दुपारी आग लागली. या आगीत इमारतीतील ३६ रहिवाशांची अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुटका केली. जखमींपैकी रोहित व शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी अग्निशमन दलाच्या जवानांना आग अटोक्यात आणण्यात यश आले. आगीच्या कारणांबाबत अग्निशमन दलाकडून तपास केला जात आहे.