मुंबई : कुख्यात दाऊद इब्राहीमच्या साथीदाराला पकडून देणारी महिला एका सायबर भामट्यांच्या जाळ्यात सापडली आहे. ‘एक्स’ खात्यावर अभिनेत्री करीना कपूरच्या बनावट जाहिरातीला भूलून तिने गुंतवलेले २३ लाख रुपये सायबर भामट्यांनी लंपास केले आहेत. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी या सामाजिक कार्यकर्त्या असून वांद्रे येथे राहतात. त्यांना एक्स या खात्यावर (पूर्वीचे ट्विटर) गुंतवणुकीसंदर्भात एक लेख आढळला.
लोकप्रिय अभिनेत्री करिना कपूर आणि गायिका श्रेया घोषाल या कंपनीची जाहिरात करत होत्या. फिर्यादी यांनी त्या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक केले होते. त्यानंतर त्यांना शशा नावाच्या महिलेचा कॉल आला. त्या महिलेने ‘फॉक्सोनेट’ या आंतरराष्ट्रीय कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. फॉक्सोनेट ही कंपनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन करते, असे सांगून गुगलवर जाऊन कंपनीच्या संकेतस्थळावरू ट्रेडींग खाते खोलण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी कंपनीच्या संकेतस्थळावर नोंदणी केली. त्यानंतर सागर, माया, राघव आदी वेगवेगळ्या नावाच्या व्यक्तींनी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून संपर्क साधून फिर्यादी यांना शेअर बाजारात ट्रेडींग करण्याविषयी माहिती दिली.
एप्रिल महिन्यात फिर्यादी यांनी शाशा या महिलेच्या सांगण्यावरून फॉक्सोनेट या कंपनीच्या संकेतस्थळावर डिपॉझिट पर्यायावर क्लिक करून आपल्या डेबीट कार्डाची माहिती दिली. सुरूवातील आणि २३२ डॉलर (भारतीय चलनातील २० हजार रुपये) हस्तांतरीत केले. त्यानंतर पहिल्यांदा शेअर विकत घेतले. या शेअरमुळे चांगला नफा झाल्याचे संकेतस्थळावर दाखविण्यात आले. पहिल्याच व्यवहारात नफा झाल्याने फिर्यादी यांचा विश्वास बसला आणि त्यांनी पुढील व्यवहार केला.
फिर्यादी महिलेने २५ एप्रिल ते ६ मे या कालवाधीत २३ लाख ४५ हजार रुपये हस्तांतरीत करून शेअर विकत घेतले. फक्त एकदाच त्यांना आपल्या खात्यातून १ लाख ६३ हजार रुपये काढता आले. नंतर उर्वरित रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता ती काढता आली नाही. फिर्यादी यांनी त्या चौघांशी संपर्क केला असता त्यांनी १० लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यामुळे फिर्यादी यांना संशय आला. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून पश्चिम विभागाच्या सायबर पोलीस ठाण्यात कलम ३१८ (४), ३१९ (२), ३३६ (२), ३३६ (३), ३३८, ३४० (२), ६१ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (सी) आणि ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाऊद विरोधात तक्रार आणि धमकी
फिर्यादी महिला या मुंबईत एक सामाजिक संस्था चालवातात. त्यांनी २०१७ मध्ये एका प्रकरणात कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या एका साथादीराविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे तक्रारदार यांना आंतररारष्ट्रीय क्रमांकावरून धमक्या आल्या होत्या. याप्रकरणी दाऊदच्या साथीदाराला अटक करण्यात आली होती. त्यावेळी फिर्यादी या चर्चेत आल्या होत्या.